पुढारी ऑनलाईन डेस्क
घरगुती कामाची जबाबदारी ही महिलांवरच हा अलिखित नियम आजही सर्वत्र आढळतो. मात्र आधुनिक उपकरणांमुळे आजच्या महिलांचे शारीरिक श्रम हे मागील पिढीपेक्षा निश्चितच कमी झाले आहेत. २० व्या शतकातील काही शोधांनी महिलांचे जगणं अधिक सुकर केले. काही शोध तर महिलांच्या प्रगतीसाठी क्रांतीकारच ठरले. यामध्ये वॉशिंग मशीन आणि फ्रिज यांचा शोध अग्रस्थानी आहेत, असे मॉन्ट्रियल यूनिवर्सिटीमधील अर्थशास्त्राच्या प्रा. इमॅनुला कार्डीया यांनी काही वर्षांपूर्वी केलेले संशोधनात स्पष्ट केले होते. आज आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ( International Women's Day ) जाणून घेवूया या संशोधनात काय म्हटलं होतं ते.
महिलांसाठी सर्वात कष्टप्रद आणि वेळखावू काम हे कपडे धुणे. वॉशिंग मशीनचा शोध हा महिलांसाठी वरदानच ठरला. या मशीनमधील तंत्रज्ञानात काही वर्षांत खूपच प्रगती झाली. कपडे धुणे हा कष्टप्रद आणि अधिक वेळ घेणारे कामच बंद झाले. तसेच फ्रीज आणि व्हॅक्युम क्लिनर या यंत्रांमुळे महिलांना स्वविकासासाठी वेळ मिळाला.
घरगुती उपकरणांच्या शोधांमुळे महिलांच्या आयुष्यात आमुलाग्र बदल झाला. महिलांचे कष्टप्रद जगणं कमी झालं. वेळेची बचत झाली. घरगुती कामाचा भार कमी झाला. कुटुंबातील आपल्या जबाबदार्या पूर्ण करत त्यांना घराबाहेर पडत रोजगारही सुरु करणे शक्य झाले. महिलांना आपलं कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी वेळ मिळाला त्यामुळे एकुण अर्थव्यवस्थेला चालना मिळाली, असेही निरीक्षणही कार्डीया यांनी आपल्या संशोधनातून नोंदवले होते.
प्रा. कार्डिया यांनी १९४० ते १९५० या कालावधीत अमेरिकेतील शहरी आणि ग्रामीण भागातील तीन हजारांहून अधिक महिलांच्या जगण्याचा अभ्यास केला होता. या संशोधनात त्यांनी असे निरीक्षण नोंदवले की, महिलांनी स्टोव्हचा वापर सुरु केल्यानंतर दररोज त्यांचा स्वयंपाकासाठीचा अर्धातासाची बचत झाली. पाश्चात्य देशात १९०० मध्ये केवळ पाच टक्के विवाहित महिला नोकरी करत असत. १९८०पर्यंत हा आकडा तब्बल ५१ टक्क्यांवर पोहचला.
१९१३ मध्ये व्हॅक्युम क्लिनरचा शोध लागला. यानंतर १९१६ मध्ये वॉशिंग मशीन तर १९१८ मध्ये फ्रीजची निर्मिती झाली. १९७३ मध्ये माक्रोव्हेव्ह बाजारात आला. या उपकरणांमुळे महिलांचे रोजच्या कष्टप्रद कामाचा कालावधी कमी झाला. शतकातील उत्तर अमेरिकेतील घरोघरी पाणीपुरवठा योजना नंतर ती युरोपमध्येही आली. याचाही महिलांचे जीवनमान बदलावर मोठा परिणाम झाला. महिलांना संसाराच्या रहाटगाड्यातून फुरसतीचा वेळ मिळाला.
१८९० मध्ये अमेरिकेतील केवळ २५ टक्के कुटुंबाकडेच थेट पाणीपुरवठा होत असे तर केवळ ८ टक्के घरांमध्ये वीज होती. पुढील ६० वर्षांमध्ये म्हणजे १९५० मध्ये ८३ टक्के घरात थेट पाणीपुरवठा तर ९४ टक्के घरात वीज मिळाली होती. १९०० मध्ये महिला आठवड्यातील तब्बल ५८ तासांहून अधिक काळ हा घरगुती कष्टप्रद कामात जात होता. १९७५ मध्ये हा कालावधी १८ तासांपर्यंत कमी झाला. या आकडेवारीवरुन आधुनिक शोध महिलांच्या प्रगतीला किती पूरक ठरले हे स्पष्ट होते.
तंत्रज्ञानामध्ये झालेल्या प्रगतीमुळे महिला आपली कुटुंबातील जबाबदारी पूर्ण करुन नोकरीही करु लागल्या. यामुळे अर्थव्यवस्थेला मोठा फायदा झाला, असेही निरीक्षण त्यांनी आपल्या संशोधनात नोंदवले होते. मागील काही वर्षांमध्ये तर आधुनिक तंत्रज्ञान वेगाने बदलत आहे. या बदलामुळे महिलांचे जीवन मागील काही वर्षांपासून सुखकर झाले आहे. याचा फायदा महिलांच्या सर्वांगीण विकासासह अर्थव्यवस्थेलाही होत असल्याचे स्पष्ट होत आहे. तसेच सेवाक्षेत्रामध्ये महिलांनी केलेली प्रगती ही लक्षणीय ठरली आहे.
हेही वाचलं का?
पाहा व्हिडीओ :