पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : भोसरी येथील वृत्तपत्र वितरक चांगदेव मलघे यांच्या एकुलत्या एक मुलाचे पुढच्या महिन्यात लग्न होते. घरात लग्नाची तयारी सुरू होती, लग्न म्हणून घरात आनंदी वातावरण होते. अशा धामधुमीत अचानक मुलाला हृदयविकाराचा झटका आला आणि क्षणात होत्याचे नव्हते झाले. मलघे कुटुंबीयावर अचानक दु:खाचा डोंगर कोसळला. कुणाल चांगदेव मलघे (वय 28) असे निधन झालेल्या मुलाचे नाव आहे. चांगदेव मलघे यांचा भोसरी येथे 30 वर्षांपासून वृत्तपत्र वितरणाचा व्यवसाय आहे.
मलघे आणि त्यांची पत्नी सुनीता मलघे यांचा दोन विवाहीत मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. कुणालचे धामधुमीत लग्न करून त्याचा संसार पाहण्याचे स्वप्न मलघे दाम्पत्याने पाहिले होते. ते काळाने अचानक हिरावून घेतले.कुणाल हादेखील मलघे यांना व्यवसायात पूर्णवेळ मदत करत होता. त्यामुळे त्याचा मोठा हातभार लागत होता. लग्न असल्यामुळे घरात कपडे, दागिन्यांची खरेदी, गाड्या व हॉल यांचे बुकिंगदेखील झाले होते. लग्नपत्रिका वाटपाचे कामदेखील सुरू होते.
दरम्यान, बुधवारी (दि. 22) कुणाल दुपारी साडेबारापर्यंत वृत्तपत्र विक्रेत्यांकडून बिलाची रक्कम भरणा करण्याबाबत फोनवरून चर्चा करत होता. अंघोळ केल्यानंतर अचानक त्रास होऊ लागला. त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, हृदयविकाराने त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
हेही वाचा