Latest

कोल्हापूर : ‘राष्ट्रीय लाईनमन दिवस’ उद्या साजरा होणार

अनुराधा कोरवी

सरुड : पुढारी वृत्तसेवा : ऊर्जा क्षेत्रातील महत्वाचे स्तंभ किंबहुना ऊर्जा आणि समाज यांना जोडून ठेवणारा सेतू संबोधले जाणाऱ्या लाईनमन (वीज तंत्रज्ञ) प्रती कृतज्ञता आणि त्यांचा सन्मान म्हणून उद्या येत्या ४ मार्चला पहिला 'राष्ट्रीय लाईनमन दिवस' साजरा केला जाणार आहे. दिल्लीतील सिल्व्हर ओक, इंडिया हॅबीटॅट सेंटरमध्ये खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी राज्य आणि केंद्रीय विद्युत महामंडळाचे निवडक ऊर्जा अधिकारी आणि लाईनमन (ऑन रोल) यांना निमंत्रित केलेले आहे.

दरम्यान ४ मार्च हा दिवस संपूर्ण भारतात राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहाची सुरुवात असेल, अशी घोषणा केंद्रीय विद्युत मंत्रालयांतर्गत विद्युत प्राधिकरणाने नुकतेच केली आहे. तसे पत्र केंदीय विद्युत प्राधिकरणाने विद्युत महामंडळाच्या अधिकाऱ्यांना पाठविले आहे. ऊर्जा (वीज) क्षेत्रातील दुरुस्ती विभागाचे कर्मचारी आणि लाईनमन हे दैनंदिन दुरूस्तीचे काम अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत करतात. ज्यायोगे नागरिकांना वीज वितरण तर होतेच याशिवाय देशात कुठल्याही दुर्घटना टाळल्या जातात.

टाटा पॉवर आणि सीईए या अग्रगण्य संस्थांच्या पुढाकाराने ४ मार्च २०२१ पासून 'लाईनमन दिवस' साजरा करायला सुरुवात झाली आहे. ४ मार्च २०२२ ला दुसरा लाईनमन दिवस टाटा पॉवर कंपनी स्तरावर दिल्लीत साजरा झाला. तसेच ओडिशा, मुंबई, गोवा, अजमेर, जम्मू-काश्मीर, उत्तर प्रदेश, झारखंड मध्येही हा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यामध्ये १५ हजार लाईनमनांना सन्मानित केले गेले. अशी आठवणही केंदीय विद्युत प्राधिकरणाने विद्युत महामंडळाच्या अधिकाऱ्यांना पाठविलेल्या पत्रात जागवली आहे.

राष्ट्रीय लाईनमन (उत्सव) दिवसाचे औचित्य साधून प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात सर्व फ्रंटलाईन वीज कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात यावे, यासाठी आवश्यक मार्गदर्शक सूचना पत्रक स्वतंत्ररित्या लवकरच प्रसारित करण्यात येणार आहे. या संपूर्ण कार्यक्रमाचे नोडल अधिकारी म्हणून कोयल त्रिवेदी धिंगरा, मनहाज यांची राष्ट्रीय पातळीवर नियुक्ती करण्यात आली आहे, असेही विद्युत प्राधिकरणाने पत्राद्वारे संबंधित वीज अधिकाऱ्यांना कळविले आहे.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT