Latest

Harshvardhan Patil : इंदापुरात कशाचा कशाला मेळ नाही : हर्षवर्धन पाटील

अमृता चौगुले

भिगवण : पुढारी वृत्तसेवा :  गेल्या नऊ वर्षांत कोणत्याच धरणातून इंदापूर तालुक्याला हक्काचे पाणी मिळायला तयार नाही. तालुक्यातील शेती व पिण्याच्या पाण्याचे हाल त्यामुळे सुरू आहेत. इंदापूर तालुक्यात कशाचा कशाला मेळ राहिलेला नाही. सगळा बट्ट्याबोळ झाल्याची टीका माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आमदार दत्तात्रय भरणे यांचे नाव न घेता केली. भिगवण येथे आयोजित कार्यक्रमास पाटील येथे आले होते. त्या वेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी भरणे यांच्यावर नाव न घेता टीका केली.पाटील म्हणाले की, इंदापूर तालुक्याचा जो कोटा होता त्यामध्ये खडकवासला, भाटघर, उजनी, निरा-भीमा हे पाण्याचे स्रोत होते. आपण सणसर कट काढला होता, त्यातून चार टीएमसी पाणी मिळणे आवश्यक होते. आपण दोन टीएमसी पाणी मिळवायचो. आता हा कट बुजून गेला आहे. खडकवासलातून 44 हजार एकरला पाणी होते, ते कमी होत होत 22 हजार एकरांवर आले.

आता तर दोन हजार एकरालाही पाणी मिळणे अवघड झाले आहे. उजनी धरणातून किती पाणी खाली सोडायचे, याचे नियोजन नाही. आता 20 टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे. उजनीतून सोलापूरसाठी एक मीटरची पाइपलाइन सुरू आहे. सोलापूरचे पालकमंत्री असताना त्यांनी पाचशे कोटींची योजना आणली असती आणि तीन मीटरची जलवाहिनी केली असती तर तीन टीएमसी पाणी गेले असते. मात्र, तसे न केल्याने 20 टीएमसी पाणी नदीतून सोडावे लागत आहे. धरण काय नदीतून पाणी सोडण्यासाठी बनविले आहे का? असा संतप्त सवाल पाटील यांनी केला. सोलापूरचे पालकमंत्री असताना त्यांनी 20 टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय झाला आहे, आता तो माघार घेता येत नाही, असे पाटील यांनी सांगितले. एकीकडे अजित पवार बारामतीचे, तर दुसरीकडे राहुल कुल दौंडचे तलाव भरून घेतात. तालुक्याचे हक्काचे पाणी कुठे जाते, हा प्रश्न त्यांनाच विचारा, असे पाटील म्हणाले.

एका फाईलला 5 हजार?
पाटील यांनी भरणे यांच्यावर टीका करताना सांगितले की, साधे तहसील कार्यालयात जावा, शिपाईसुद्धा म्हणतो पाच हजार द्या, नाहीतर हात लावणार नाही. एवढी हिम्मत कशी होते? असा सवाल करून ते म्हणाले, रस्त्यांची कामे आपल्या काळातील व त्यांच्या काळातील पाहावीत. ठेकेदारसुद्धा वैतागल्याच्या तक्रारी आपल्याकडे व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे आल्या आहेत. उजनीत एक मासा सापडण्यास तयार नाही, दहा वर्षांत मत्स्यबीज सोडता आले नाही, अशी टीका पाटील यांनी केली.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT