Latest

Dharmendra Pradhan : देशाची अर्थव्यवस्थाच गोखले संस्थेतून निर्माण झाली : धर्मेद्र प्रधान

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुढील पंचवीस वर्षांत भारत हा जागतिक घडामोडींचे केंद्र असणार आहे. 2027 पर्यंत भारत जगातील तिसरी मोठी विकसित अर्थव्यवस्था असेल. गेल्या शंभर वर्षात देशाच्या आर्थिक प्रगतीत पुणे शहरातील गोखले संस्थेने मोठे योगदान दिले आहे. देशाची अर्थव्यवस्थाच या संस्थेतून निर्माण झाल्याचे गौरवोद्गार केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी येथे काढले.

गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेचा २९ वा पदवीप्रदान सोहळा शनिवारी गोखले संस्थेच्या सभागृहात संपन्न झाला. या वेळी प्रधान बोलत होते. व्यासपीठावर राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, संस्थेचे कुलगुरू अजित रानडे या वेळी उपस्थित होते. या वेळी पदवी, पदव्युत्तर पदवी, पीएच. डी. ही पदवी विद्यार्थ्यांना प्रदान करण्यात आली. या वेळी प्रमुख पाहुण्यांसह पदवी घेणा-या प्रत्येक विद्यार्थ्याच्या गळ्यात करवती काठाचे खास उपरणे होते. पदवीप्रदान सोहळ्यात हे वेगळे चित्र या वेळी पाहावयास मिळाले.
गोखले संस्थेत शिक्षण घेण्याची इच्छा होती.

प्रधान म्हणाले की, पुणे हा कल्पनांचा 'मेल्टिंग पॉट' आहे. 21वे शतक हे ज्ञानाधिष्ठित समाजाचे आहे. मला नेहमीच पुण्याला यायला आवडते. पुणे भविष्यवेधी, जागतिक शहर आहे. मानवशास्त्रात पदवी मिळवल्यानंतर गोखले संस्थेत पदव्युत्तर पदवीला प्रवेश घेण्याची इच्छा होती. मात्र, ते जमले नाही, अशी खंत त्यांनी बोलून दाखवली.

गोखले संस्थेतून देशाच्या अर्थव्यस्थेचा जन्म

देशाची व्यवस्थाच गोखले संस्थेतून निर्माण झाली. देशाची ऐतिहासिक पार्श्वभूमी गोखले संस्थेत आहे. पुढील पंचवीस वर्षांत जागतिक घडामोडींचे केंद्रस्थान भारत असणार आहे. 2027 पर्यंत भारत जगातील तिसरी विकसित अर्थव्यवस्था असेल. डिजिटल पेमेंट इंटरफेसमध्ये भारताने जे साध्य केले, ते जगाला जमलेले नाही. आता विद्यार्थ्यांचा विचार स्वतःच्या पॅकेजपुरता मर्यादित न राहता जगाचा विचार करणारा असायला हवा, असेही प्रधान यांनी सांगितले.

मराठा आरक्षणासाठी मोठे काम : चंद्रकांत पाटील

राज्याचे उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, की मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनावेळी गोखले संस्थेने सर्वेक्षणाचे मोठे काम केले. शेतकरी आत्महत्येबाबतचा अभ्यास गोखले संस्थेनेच केला होता. आता पुन्हा मराठा आरक्षणाचा विषय उद्भवला असताना पुन्हा गोखले संस्थेची मदत घेतली जाईल.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT