Latest

पुणे: हवाप्रदूषणात दहापट वाढ; तज्ज्ञ म्हणतात, वाहतूक सुरू झाल्यावर घराबाहेर व्यायाम करू नका

अमृता चौगुले

आशिष देशमुख

पुणे : जागतिक आरोग्य संघटनेच्या मानांकानुसार पुणे शहर व परिसरातील हवेची गुणवत्ता 10.1 पटीने खराब असल्याची नोंद रविवारी सायंकाळी झाली. शहरातील लोहगाव विमानतळ, येरवडा, निगडी हे परिसर अतिप्रदूषित, तर शिवाजीनगर कर्वे रोड, कात्रज रोड, पाषाण भागातील हवा अनारोग्यकारक असल्याचा अहवाल हाती आला आहे. शहरातील हवेची गुणवत्ता सफार (सिस्टिम ऑफ एअर क्वालिटी अ‍ॅन्ड वेदर फोरकास्टिंग अ‍ॅन्ड रिसर्च) व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने मोजली जाते.

देशात दिल्ली, मुंबई, अहमदाबाद नंतर पुणे शहराची हवा दिवसेंदिवस खराब होत आहे. वाहनांची वाढणारी प्रचंड वर्दळ अणि इंधन ज्वलनातून निघणारे सूक्ष्म धूलिकण याचे प्रमाण हे जागतिक आरोग्य संघटनेच्या मानांकानुसार प्रमाणाबाहेर जात आहे. तसेच शहरात बांधकामे, राडारोडा यासह औद्योगिक प्रदूषण हे घटक देखील हवेची गुणवत्ता खराब करण्यात मोठा वाटा उचलत आहेत.

रविवारी शहराची हवेची गुणवत्ता ही सरासरी 169 मायक्रो ग्रॅम प्रतिचौरस मीटर इतकी मोजली गेली. ती कमीत कमी 60 ते 80 च्या जवळ हवी, मात्र शहरातील काही भाग तर 200 च्याही वर गेले आहेत. त्यामुळे पुणेकरांनी बाहेर पडताना सतत मास्क वापरणे गरजे आहेत. सकाळी वाहनांची वर्दळ सुरू झाली की बाहेरचा व्यायाम टाळावा. सायकलवर फिरणे शक्यतो टाळावे. कारण श्वाच्छोश्वास वाढल्यास प्रदूषित धुलिकणांचा त्रास होऊ शकतो, असेही तज्ज्ञांनी म्हटले आहे.

उन्हाळ्यात वाढते प्रदूषण

जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, उन्हाळ्यातील मार्च ते एप्रिल महिन्यात हवा कोरडी असते. हवेत आर्द्रतेचे प्रमाणही कमी होते. त्यामुळे वातावरणात प्रदूषित धूलिकणांचे प्रमाण वाढते. यंदाही उन्हाळ्यातील तीन महिन्यांत पुण्यातील हवा प्रदूषणात त्यामुळे दहापटीने वाढ झाल्याचे समोर आले आहे.

पीएम 2.5चे प्रमाण दहापटीने वाढले

हवेत दोन प्रकारचे धूलिकण असतात, यात पीएम 2.5(पार्टिक्युलेटमॅटर) व पीएम 10 यांचा समावेश आहे. 2.5 पीएम म्हणजे अतिसूक्ष्म व 10 पीएम म्हणजे सूक्ष्म धूलिकण, हे दोन्ही धूलिकण डोळ्यांनी दिसत नाहीत. श्वासोच्छ्वासाद्वारे आपल्या फुफ्फुसात जातात. रविवारी 29 मे रोजी हे प्रमाण जागतिक आरोग्य संघटनेच्या मानांकानुसार 10.1 पटीने वाढल्याची नोंद झाली. या अतिसूक्ष्म धूलिकणाची सरासरी 48 ते 52, तर सूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण 71 ते 78 वर गेल्याची नोंद झाली. ओझोन, कार्बन मोनोऑक्साईड व नायट्रोजनडाय ऑक्साईडचे प्रमाणही प्रदूषित पातळीवर गेल्याची नोंद झाली.

  • जागतिक आरोग्य संघटनेच्या मानांकानुसार शहरातील हवेची गुणवत्ता अनारोग्यकारक
  • लोहगाव, येरवडा, निगडीची हवा अतिप्रदूषित
  • शिवाजीनगर, कर्वे रोड, कात्रज रोड, कोथरूड, पाषाणची हवाही आरोग्यदायी नाही

सरासरी हवेची गुणवत्ता 169 (अनारोग्यकारक)

अतिसूक्ष्म धूलिकण (पीएम 2.5)           48 ते 52 मा.ग्रॅ.प्रति चौ.मी
सूक्ष्म धूलिकण (पीएम 10)                    71 ते 78 मा.ग्रॅ.प्रति चौ.मी
ओझोन (O3)                                     352.8 मा.ग्रॅ.प्रति चौ.मी
नायट्रोजन डाय ऑक्साईड (NO2)          19.3 मा.ग्रॅ.प्रति चौ.मी
कार्बन मोनोऑक्साईड ( CO )              1132.6 मा.ग्रॅ.प्रति चौ.मी

(स्त्रोत : सफर आयआयटीएम, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व जागतिक आरोग्य संघटना)

अनारोग्यकारक हवा ठरलेले भाग

भाग                    हवेची गुणवत्ता
कर्वे रोड                   183
कात्रज रोड               169
कोथरूड                 161
पाषाण                     132

अतिप्रदूषित ठरलेले भाग

भाग                                       हवेची गुणवत्ता
पुणे विमानतळ                  236 मायक्रो ग्रॅम प्रति चौ.मी.
निगडी                             219 मायक्रो ग्रॅम प्रति चौ.मी.
येरवडा                            236 मायक्रो ग्रॅम प्रति चौ.मी.
रावेत                               219 मायक्रो ग्रॅम प्रति चौ.मी.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT