Latest

Tejashri Pradhan : प्रेक्षकांच्या भेटीला येतेय तेजश्री प्रधानची नवी मालिका ‘प्रेमाची गोष्ट’

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : अलीकडेच तेजश्री प्रधान आणि शुभांगी गोखले यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांची नवी मालिका स्टार प्रवाहवर सुरु होणार असल्याचं सांगितलं. ही नवी मालिका नेमकी कोणती? मालिकेची गोष्ट काय असेल? (Tejashri Pradhan) कोणते कलाकार असतील? याविषयी प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता होती. ज्या मालिकेविषयी इतकं भरभरुन बोललं जातंय. ही मालिका ४ सप्टेंबरपासून रात्री ८ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  (Tejashri Pradhan)

मालिकेचं नाव आहे प्रेमाची गोष्ट. स्टार प्रवाहच्या प्रत्येक मालिकेतून नातेसंबंधांवर भाष्य केलं जातं. प्रेमाची गोष्ट ही मालिकादेखील नात्यांची गुंफण असेल. चिमुकल्या सईवरच्या प्रेमापोटी दोन विभिन्न स्वभावाचे मुक्ता आणि सागर कसे एकत्र येतात आणि त्यांच्यातलं प्रेम कसं बहरत जातं हे सांगणारी सुंदर, तरल कथा म्हणजे प्रेमाची गोष्ट.

प्रेमाची गोष्ट या नव्या मालिकेत प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री तेजश्री प्रधान मुक्ता गोखले ही भूमिका साकारणार आहे तर राज हंचनाळे सागर कोळीच्या भूमिकेत दिसेल. यासोबतच शुभांगी गोखले, संजीवनी जाधव, अपूर्वा नेमळेकर, संजय शेजवळ, योगेश केळकर, उमेश घाडगे, सुप्रीत कदम आणि बालकलाकार इरा पारवडे अशी दिग्गज कलाकारांची फौज मालिकेतून भेटीला येईल. राहुल लिंगायत या मालिकेचं दिग्दर्शन करणार आहेत.

मुक्ता गोखले या व्यक्तिरेखेविषयी सांगताना तेजश्री प्रधान म्हणाली, 'स्टार प्रवाह वाहिनीसोबत जवळपास १३ वर्षांनी पुन्हा एकदा काम करताना अतिशय आनंद होतोय. घराघरातील गृहिणी समरसून मालिका पहात असतात. त्यामुळे एक कलाकार म्हणून कोणतंही पात्र साकारताना सामाजिक जबाबदारीचं भान राखण्याचा मी प्रयत्न करते. मुक्ता हे पात्रं प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. मुक्ता साकारतान माझ्यासमोर मुलगी, सून आणि आईच्या भूमिकेतला समंजसपणा जपण्याचं आव्हान असेल.'

मुक्ताच्या आईची म्हणजेच माधवी गोखले ही भूमिका साकारणार आहेत प्रसिद्ध अभिनेत्री शुभांगी गोखले. 'या भूमिकेविषयी सांगताना शुभांगी गोखले म्हणाल्या, स्टार प्रवाहसोबत खूप जुनं नातं आहे. अग्निहोत्र, अग्निहोत्र २ आणि आता प्रेमाची गोष्ट. मालिकेची टीम खूप उत्तम आहे. या मालिकेचं लेखन हे बलस्थान म्हणता येईल. माधवी या पात्राच्या निमित्ताने साधेपणातलं सौंदर्य जपायला मिळेल.'

SCROLL FOR NEXT