Latest

Team India World Record : टीम इंडियाने रचली विक्रमांची मालिका! 17वी कसोटी मालिका जिंकून रचला इतिहास

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : Team India World Record : भारताने सोमवारी इंग्लंडविरुद्धचा चौथा कसोटी सामना पाच गडी राखून जिंकला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मिळालेल्या या विजयानंतर विक्रमांची मालिका रचली गेली आहे.

12 वर्षांत सलग 17वा कसोटी मालिका विजय

भारताने मायदेशात गेल्या 12 वर्षांतील सलग 17वी कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला आहे. टीम इंडियाने 2012-13 मध्ये घरच्या मैदानावर मालिका गमावली होती. त्यावेळी पाहुण्या इंग्लंडने 2-1 मालिका जिंकली होती. मात्र, तो पराभव पचवत भारतीय संघाने नव्याने उभारी घेतली आणि त्यानंतर विजयाची घोडदौड 22 फेब्रुवारी 2013 पासून यशस्वीरित्या सुरू केली. जी आतापर्यंत 17 वी कसोटी मालिका जिंकून कायम ठेवली आहे. या विक्रमाच्या यादीत ऑस्ट्रेलियाचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. कांगारूंनी 1994 ते 2001 पर्यंत मायदेशात सलग 10 कसोटी मालिका जिंकल्या होत्या. 2004 आणि 2008 दरम्यान ऑस्ट्रेलियाने पुन्हा एकदा या पराक्रमाची पुनरावृत्ती केली होती.

मायदेशात सलग कसोटी मालिका जिंकणारे संघ (Team India World Record)

भारत : 17 मालिका विजय : फेब्रुवारी 2013 पासून मोहीम सुरू आहे
ऑस्ट्रेलिया : 10 मालिका विजय : नोव्हेंबर 1994 ते नोव्हेंबर 2000 पर्यंत
ऑस्ट्रेलिया : 10 मालिका विजय : जुलै 2004 ते नोव्हेंबर 2008 पर्यंत
वेस्ट इंडिज : 8 मालिका विजय : मार्च 1976 ते फेब्रुवारी 1986 पर्यंत
न्यूझीलंड : 8 मालिका विजय : 2017 ते 2021
वेस्ट इंडिज : 7 मालिका विजय : मार्च 1998 ते नोव्हेंबर 2001 पर्यंत
दक्षिण आफ्रिका : 7 मालिका विजय : मे 2009 ते मे 2012 पर्यंत

0-1 पिछाडीनंतर भारताचा सातव्यांदा मालिका विजय

मालिकेत 0-1 ने पिछाडीवर पडल्यानंतर भारताने सातव्यांदा कसोटी मालिका जिंकली आहे. तसेच 2013 नंतर पहिल्यांदाच भारतीय मैदानावर एखाद्या संघाने 150 हून अधिक धावांच्या लक्ष्य यशस्वीपणे पाठलाग केला आहे. याआधी मार्च 2013 मध्ये भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध दिल्ली कसोटीत विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना सहा गडी राखून विजय मिळवला होता. (Team India World Record)

भारताची पिछाडीवरून विजयी आघाडी

2-1 (5 सामने) : विरुद्ध इंग्लंड 1972-73
2-1 (3 सामने) : विरुद्ध ऑस्ट्रेलिया 2000-01
2-1 (3 सामने) : विरुद्ध श्रीलंका 2015
2-1 (4 सामने) : विरुद्ध ऑस्ट्रेलिया 2016-17
2-1 (4 सामने) : विरुद्ध ऑस्ट्रेलिया 2020-21
3-1 (4 सामने) : विरुद्ध इंग्लंड 2020-21
3-1 (4* सामने) : विरुद्ध इंग्लंड 2023-24 (पाचवा सामना खेळणे बाकी आहे.)

150+ धावांचा पाठलाग करताना भारताने जिंकले 30 सामने

भारतीय संघाला घरच्या मैदानावर 33 वेळा 200 पेक्षा कमी धावांचे विजयी लक्ष्य मिळाले आहे. त्यापैकी 30 सामन्यांत टीम इंडियाने विजय मिळवला आहे. तर कसोटी ड्रॉ झाल्या आहेत. (Team India World Record)

रोहित शर्माने राहुल द्रविडला टाकले मागे

भारतीय कर्णधार म्हणून सर्वाधिक कसोटी सामने जिंकण्याच्या बाबतीत रोहित शर्माने राहुल द्रविडला मागे टाकले आहे. रोहित 9 कसोटी विजयांसह संयुक्त पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. द्रविड (8) सहाव्या क्रमांकावर आहे.

सर्वाधिक कसोटी जिंकणारे भारतीय कर्णधार

40 : विराट कोहली
27 : एमएस धोनी
21 : सौरव गांगुली
14 : मोहम्मद अझरुद्दीन
9 : रोहित शर्मा*
9 : सुनील गावसकर
9 : नवाब पतौडी
8 : राहुल द्रविड

इंग्लंडचा सलग 11 वर्षे पराभव

इंग्लंड संघाने भारतीय भूमीवर कसोटी मालिकेतील शेवटचा विजय 2012-13 मध्ये मिळवला होता. म्हणजे गेल्या 11 वर्षांपासून इंग्लिश संघ भारतात एकही द्विपक्षीय कसोटी मालिका जिंकू शकलेला नाही. इंग्लंड संघाने भारताविरुद्ध 17 कसोटी मालिका खेळल्या, त्यापैकी फक्त 5 मालिका जिंकल्या. तर भारताने 9 कसोटी मालिका जिंकल्या आहेत. दोन्ही संघांमध्ये 3 मालिका अनिर्णित राहिल्या. भारत आणि इंग्लंड यांच्यात आतापर्यंत 36 द्विपक्षीय कसोटी मालिका खेळल्या गेल्या आहेत. या काळात भारताने 12 मालिका जिंकल्या, तर 19 मालिका गमावल्या. 5 मालिका अनिर्णित राहिल्या आहेत.

टीम इंडियाचे मायदेशात वर्चस्व

इंग्लंड आणि भारत यांच्यात आतापर्यंत एकूण 135 कसोटी सामने खेळले गेले आहेत, ज्यापैकी भारतीय संघाने 34 तर इंग्लंडने 51 जिंकल्या आहेत. 50 कसोटी अनिर्णित राहिल्या आहेत. भारतीय भूमीवर दोन्ही संघांमध्ये एकूण 68 कसोटी सामने खेळले गेले आहेत त्यापैकी केवळ 15 कसोटी इंग्लंडला जिंकता आल्या आहेत. तर भारताने 25 कसोटी सामने जिंकले आहेत. 28 सामने अनिर्णित राहिले आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT