पुढारी ऑनलाईन डेस्क : WTC Points Table : ऑस्ट्रेलियाने मेलबर्न कसोटीत (australia) द. आफ्रिकेचा एक डाव आणि 182 धावांनी पराभव करत तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. या विजयासह ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (World Test Championship) अंतिम फेरीत पोहोचण्याचा आपला दावा आणखी मजबूत केला आहे. दरम्यान, या सामन्याच्या एकतर्फी निकालामुळे टीम इंडियाला (Team India) जबरदस्त फायदा असून डब्ल्यूटीसीच्या गुणतालिकेतील दुसरे स्थन मजबूत झाले आहे.
टीम इंडियाने (Team India) अलीकडेच बांगलादेशवर 2-0 असा मालिका विजय नोंदवून जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत दुसरे स्थान मिळवले. बॉक्सिंग डे कसोटीपूर्वी दक्षिण आफ्रिका 54.55 टक्के गुणांसह तिसर्या स्थानावर होता, मात्र ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या या दारुण पराभवानंतर ते चौथ्या स्थानावर घसरले आहेत. द. आफ्रिका संघाचे (south africa team) आता 50 टक्के गुण झाले आहेत. त्याचवेळी श्रीलंका संघ 53.33 टक्के गुणांसह तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. त्याचवेळी टीम इंडिया 58.93 टक्के गुणांसह दुसऱ्या तर ऑस्ट्रेलिया 78.57 टक्के गुणांसह पहिल्या क्रमांकावर कायम आहेत. त्यामुळे आस्ट्रेलिया अंतिम फेरीत धडक मारेल हे जवळपास निश्चित झाले आहे. तर भारत आणि द. आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यात दुस-या स्थानासाठी चुरशीची शर्यत सुरू आहे.
मेलबर्न कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कॅमेरून ग्रीन आणि संघाच्या इतर गोलंदाजांनी कर्णधाराचा निर्णय योग्य ठरवला आणि पाहुण्या संघाला 189 धावांत गुंडाळले. ग्रीनने या काळात कसोटी कारकिर्दीत पहिल्यांदाच 5 बळी घेतले. यजमानांना स्वस्तात गुंडाळल्यानंतर ऑस्ट्रेलियन फलंदाजांनीही वादळी खेळी केली.
यजमानांनी पहिला डाव 575 धावांवर घोषित केला. यादरम्यान डेव्हिड वॉर्नरने ऑस्ट्रेलियाकडून 100वी कसोटी खेळताना द्विशतक झळकावले, तर विकेटकीपर अॅलेक्स कॅरीने 111 धावांची शानदार खेळी केली. पहिल्या डावानंतर 386 धावांनी पिछाडीवर पडलेल्या दक्षिण आफ्रिकेचा संघ दुसऱ्या डावात 204 धावांवर गारद झाला. यावेळी नॅथन लायनने तीन आणि बोलँडने दोन गडी बाद केले. तर मिचेल स्टार्क, स्टीव्ह स्मिथ, पॅट कमिन्सन यांना प्रत्येकी 1-1 बळी घेण्यात यश आले.
मालिकेतील शेवटचा सामना 4 जानेवारीपासून सिडनी येथे खेळवला जाणार असून याही सामन्यात विजय मिळवून द. आफ्रिकेचा व्हाईट वॉश करणे हेच ऑस्ट्रेलियाचे लक्ष्य असणार आहे. तर द. आफ्रिका लाजिरवाणा मालिका पराभव टाळण्यासाठी मैदानात उतरेल अशी आशा आहे.