Latest

विराट कोहली संतापला; म्हणाला, ‘मला काहीही सिद्ध करण्याची गरज नाही’

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटची कसोटी मंगळवारपासून केपटाऊनमध्ये खेळवली जाणार आहे. तत्पूर्वी विराट कोहलीने आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्याने फिटनेस, फॉर्म आणि प्लेइंग-11 यावरील प्रश्नांची उत्तरे दिली. या दौऱ्यावर पहिल्यांदाच तो माध्यमांसमोर आला.

विराटने ब-याच दिवसांनी माध्यम प्रतिनिधींच्या प्रश्नांच्या बाउन्सर्सचा सडेतोड समाचार घेतला. विराटच्या फिटनेसबाबत प्रश्न विचारला असता त्याने तिसरा सामना खेळण्यासाठी मी पूर्णपणे तयार आहे, असे स्पष्ट केले. या उत्तराबरोबर त्याच्या फिटनेसबाबत सुरू असलेल्या चर्चांना पूर्ण विरामच दिला.

फलंदाजीच्या फॉर्मवरून प्रश्न विचारला असता कर्णधार कोहली म्हणाला की, माझ्या फलंदाजीवर प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची ही पहिलीच वेळ नाही. २०१४ च्या इंग्लंड दौऱ्यातही असा प्रकार घडला होता. मला माहित आहे की मी संघाच्या अत्यंत महत्त्वाच्या क्षणांचा एक भाग आहे. गेल्या वर्षभरात मी संघासाठी अनेक महत्त्वाच्या भागीदारींचा एक भाग आहे. मला या वस्तुस्थितीवर विश्वास आहे की मला कोणालाही काहीही सिद्ध करण्याची आवश्यकता नाही. बाहेरचे लोक काय म्हणतात हे माझ्यासाठी महत्त्वाचे नाही.

विराट म्हणाला की, मोहम्मद सिराज पुढील कसोटीसाठी तंदुरुस्त आहे असे मला वाटत नाही. वेगवान गोलंदाजांसोबत तुम्ही धोका पत्करू शकत नसल्याचे त्याने सांगितले. मात्र, केप टाऊन कसोटीत सिराजची जागा कोण घेणार हे विराटने स्पष्ट केले नाही. याबाबत तो, प्रशिक्षक आणि उपकर्णधार यांच्याशी चर्चा करूनच निर्णय घेणार असल्याचे समजते.

आम्ही संघाला पहिल्या क्रमांकावर नेले…

विराट कोहली म्हणाला की, जेव्हा मी संघाचे कर्णधारपद स्वीकारले तेव्हा आम्ही सातव्या क्रमांकावर होतो. पण आता आपण ती गोष्टही पाहू शकत नाही, कारण आपण बराच काळ नंबर वन आहोत. दुसरा कसोटी सामना न खेळण्याबाबत विराट कोहली म्हणाला की, दुखापत हा खेळाचा एक भाग आहे. अशाच दुखापतीने मलाही गाठलं. पाठदुखीमुळे मी बऱ्याच दिवसांनी एखाद्या सामन्याला मुकलो. माझ्यासाठीही तो एक धक्का होता, असेही त्याने सांगितले.

विराट जोहान्सबर्ग येथील दुस-या कसोटीत विराट दुखापतीमुळे खेळला नव्हता. त्याच्या अनुपस्थितीत केएल राहुलने भारताचे नेतृत्व केले.

विराटला भारतीय खेळाडूंच्या फिटनेसबाबतही प्रश्न विचारण्यात आले. यावर विराट म्हणाला, आपण खूप क्रिकेट खेळतो हे विसरता कामा नये. आम्हाला सर्व आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी आमचा सर्वोत्तम संघ मैदानात उतरवायचा आहे. पण, आता जेवढे क्रिकेट खेळले ते लक्षात घेता, काही खेळाडूंना वेळोवेळी दुखापत होणे ही असामान्य गोष्ट नसल्याचे तो म्हणाला.

पुजारा आणि रहाणेबाबत कोहली म्हणाला की, आम्ही जबरदस्तीने बदल करू शकत नाही. या दोघांनी जोहान्सबर्ग कसोटीत चांगली फलंदाजी केली. आम्ही कोणावर दबाव आणू शकत नाही. त्याचवेळी कोहलीने ऋषभ पंतच्या खराब शॉट निवडीबद्दलही प्रतिक्रिया दिली. आपल्या कारकिर्दीत निर्णायक प्रसंगी आपण सर्वजण काही ना काही चुका करतो असे सांगत जोहान्सबर्ग कसोटीच्या दुसऱ्या डावात ऋषभ पंत खराब फटका मारून बाद झाला. त्यामुळे संघाला फटका बसला, असे तो म्हणाला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT