पुणे ; पुढारी वृत्तसेवा : सोलापूर रोडवरील यवत गावाजवळ असलेल्या महाराष्ट्र बँकेचे एटीएम फोडून त्यामधून २३ लाख ८० हजार ७०० रुयांची रोकड चोरी करणाऱ्या टोळीला पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. सर्वात गंभीर प्रकार म्हणजे आरोपींनी यु ट्युबवरुन घरफोडी व एटीएम चोरी कशी करायची याची माहिती एकत्र केली. एवढेच नाही तर त्यासाठी लागणारे सर्व साहित्य आरोपींनी ऑनलाईन मागविल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. (Robbery at ATM)
अजय रमेशराव शेंडे (वय ३२, रा. सहजपूर, ता. दौंड), शिवाजी उत्तम गरड (वय २५, रा. करंजी, पो. ता. सिसोड, जि. वाशीम), ऋषिकेश काकासाहेब किरतिके (वय २२, रा. देवधानुरा, ता. कळंब, जि. उस्मानाबाद) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर त्यांचे अन्य दोन साथीदार फरार आहेत. त्यांच्याकडून १० लाख रुपये व मोटारसायकल, गॅस कटर व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. यातील अजय शेंडे हा मुख्य सुत्रधार आहे.
पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले. यवत येथील महाराष्ट्र बँकेचे एटीएम, मशिन कापून चोरट्यांनी २३ लाख ८० हजार७०० रुपये चोरुन नेले होते. १७ जानेवारी रोजी पहाटे अडीच ते चार वाजण्याच्या दरम्यान हा दरोडा टाकण्यात आला होता. त्यापुर्वी देखील १६ जानेवारीला कुरकुंभ येथील स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला होता.
ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके व यवत पोलीस ठाण्याचे निरीक्षक नारायण पवार व त्यांच्या पथकाने या संपूर्ण परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे खंगाळले होते. त्यावेळी दुचाकीवरील आरोपी कॅमेऱ्यात कैद झाल्याचे दिसून आले. त्यातील एका मोटारसायकलच्या मागे गॅस सिलेंडर लावलेला दिसून आला. त्यावरुन शोध घेऊन पोलिसांनी या तिघांना पकडले आहे.
यवत व कुरकुंभ येथील एटीएम चोरी तसेच लातूर जिल्ह्यातील गातेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ए टी एम मशीन गॅस कटरने कापून त्यातील ७ लाख ६७ हजार रुपये चोरुन नेले होते. वाशीम येथील घरफोडी करुन १ लाख ८४ हजार रुपयांचे १२ तोळे सोने व लॅपटॉप चोरुन नेले होते. हे चार गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे.
या गुन्ह्यांच्या शोधासाठी पोलीस निरीक्षक अशोक शेळके व नारायण पवार, सहायक निरीक्षक संदीप येळे, पोलीस उपनिरीक्षक अमोल गोरे, रामेश्वर धोंडगे, संजय नागरगोजे यांच्या नेतृत्वाखाली २० पोलीस अंमलदारांची ४ पथके तयार केली होती.
आरोपी ऋषिकेश किरतिके याच्या भावाला मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यात अटक झाली आहे. त्याला सोडविण्यासाठी वकिल व इतरअसा त्याचा दीड लाख रुपये खर्च झाला होता. त्यामुळे तो या टोळीत सहभागी झाला होता. तर अजय शेंडे हा सहजपूर येथे राहणारा असून तो लेबर कॉन्ट्रॅक्टर आहे. तो १२ वी पास आहे. ऋषिकेश हा कामासाठी त्याच्याकडे येत होता.
यातील आरोपी शिवाजी गरड याचीही अजय शेंडे याच्याशी कामासाठी ओळख झाली होती. गरड व शेंडे यांनी पैसे कमविण्यासाठी घरफोडी करण्याचा व एटीएम चोरी करण्याचा प्लॅन तयार केला. त्यानुसार अजय शेंडे याने यु ट्युबवरुन घरफोडी, एटीएम चोरी कशी करावी याची माहिती गोळा केली. त्याकरीता लागणारे साहित्य ऑनलाईन मागवून घेतले होते. या टोळीवर उघडकीस आलेल्या चार गुन्ह्याव्यतिरिक्त ३ चोरीचे गुन्हे दाखल आहेत. आरोपींनी आणखी काही गुन्हे केले असण्याची शक्यता आहे.
गेल्या वर्षभरात पुणे ग्रामिण पोलिसांच्या हद्दीत १४ एटीएम फोडल्याचे गुन्हे दाखल आहेत. दाखल गुन्ह्यांचा तपास करून पोलिसांनी ४ टोळ्या पकडल्या आहेत. बॅंकेवर सशस्त्र दरोडा टाकल्याच्या घटना देखील गेल्या वर्षात घडल्या आहेत. पुर्वी एटीएम सेंटरवर सुरक्षा रक्षक तैनात केले जात होते. मात्र आता बॅँकाकडून त्याची फारशी काळजी घेतली जात नसल्याचे दिसते.
एटीम सेंटर व बँकाचा विमा उतरवल्यामुळे ते देखील निर्धास्त झाले आहेत. त्यामुळे बँका व एटीएम सेंटरची सुरक्षा विमाभरोसेच म्हटले तर वावगे ठरणार नाही. अनेकदा पोलिसांकडून एटीएम सेंटर व बँकाच्या सुरक्षिततेच्या बाबातीत वारंवार कळविले जाते.मात्र त्याला फारशे गांभीर्याने घेतल्याचे दिसून येत नाही. एटीएमच्या सुरक्षेसाठी बँकांना सुरक्षारक्षक नेण्याबाबत बँकांना लेखी पत्र दिले असल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सांगितले.