पुणे : पुढारी वृत्तसेवा : वेळच्या वेळी सकस आहार…पुरेशी आणि शांत झोप…भरपूर पाणी पिण्याची सवय…आवडीच्या छंदासाठी दिवसातून थोडासा वेळ…सकारात्मकता आणि पालकांशी संवाद या मार्गांनी परीक्षा काळात शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी विद्यार्थ्यांना दिला आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षा अगदी जवळ येऊन ठेपलेल्या आहेत. त्यामुळे मुलांमध्ये, पालकांमध्ये आणि पर्यायाने कुटुंबामध्ये तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
वर्षभर मनापासून अभ्यास केला असला तरी शेवटच्या क्षणी सर्व काही व्यवस्थित होईल का, परीक्षा निर्विघ्न पार पडेल का, चांगले मार्क मिळतील का, अशा शंका सतावत असतात. त्यामुळे सतत पुस्तकात डोके घालून बसले तरी टेन्शनमुळे अभ्यासात लक्ष लागत नाही, तब्येत बिघडते. त्यामुळे अभ्यासावर आणि आत्मविश्वासावर परिणाम होतो. पालकही टेन्शन घेत असल्याने विद्यार्थ्यांवर दबाव निर्माण करतात. त्यामुळे संपूर्ण कुटुंबाचे आरोग्य बिघडते. त्यामुळे पालकांनी आणि मुलांनी ताण न घेता शांतपणाने परीक्षेला सामोरे जावे, असा सल्ला मानसोपचारतज्ज्ञ डॉ. भूषण मेहता यांनी दिला आहे.
डॉ. अलका लिमये म्हणाल्या, 'परीक्षा काळात मुलांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपणे महत्वाचे आहे. तसेच, दहावी किंवा बारावीची परीक्षा म्हणजे आयुष्याचा शेवट नाही, हाही विश्वास त्यांच्यामध्ये निर्माण करण्याची गरज असते. काही विद्यार्थी अतितणावामुळे नैराश्याच्या गर्तेत जातात. अशा वेळी मुलांसाठी समुपदेशकांची मदत घ्यावी.'
हेही वाचा