Latest

T20 WC Semi Final : भारताच्या ‘सेमी फायनल’साठी पंच, सामनाधिका-यांची नावे जाहीर

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : T20 WC Semi Final : टी 20 विश्वचषक स्पर्धेच्या सुपर 12 फेरीताल सर्व गट सामने संपले आहेत. यातून उपांत्य फेरीसाठी चार संघ निश्चित झाले आहेत. आता आयसीसी (ICC)ने या बाद फेरीसाठी जोरदार तयारी सुरू केली असून पुढील सामन्यांसाठी पंच आणि सामना अधिकाऱ्यांची घोषणा केली आहे. ICC ने सोमवारी याबाबत माहिती दिली. (t20 wc semi final icc announced umpires for india vs england t20 world cup semi final)

सिडनी येथे बुधवारी (9 नोव्हेंबर) न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यातील पहिल्या उपांत्य सामन्यात (T20 WC Semi Final) द. आफ्रिकेचे मराइस इरास्मस आणि इंग्लंडचे रिचर्ड इलिंगवर्थ हे मैदानी पंच म्हणून काम पाहतील. तर रिचर्ड केटलबरो हे तिसरे पंच आणि रिचर्ड गॉ हे चौथे पंच म्हणून भूमिका बजावतील. या सामन्यासाठी ख्रिस ब्रॉड सामनाधिकारी असतील.

दुसरीकडे, अॅडलेड येथे गुरुवारी (10 नोव्हेंबर) होणाऱ्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या उपांत्य सामन्यासाठी (T20 WC Semi Final) श्रीलंकेचे कुमार धर्मसेना आणि ऑस्ट्रेलियाचे पॉल रीफेल मैदानी पंचांची भूमिका बजावतील. या सामन्याच्या तिसऱ्या पंचाची जबाबदारी ख्रिस गॅफनी सांभाळणार असून रॉड टकर हे चौथे पंच आणि डेव्हिड बून सामनाधिकारी असतील.

आयसीसीने मात्र, फायनलच्या (T20 WC Final) सामन्यासाठी पंच आणि सामनाधिकाऱ्यांची नावे जाहीर केलेली नाहीत. एका निवेदनात म्हटले आहे की, मेलबर्न क्रिकेट मैदानावर 13 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या अंतिम सामन्यासाठी पंचांची नियुक्ती उपांत्य फेरीच्या निकालानंतर केली जाईल.

विश्वचषक स्पर्धेबद्दल बोलायचे झाल्यास, भारत आणि पाकिस्तान सुपर 12 फेरीतील गट 2 मधून उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले आहेत, तर न्यूझीलंड आणि इंग्लंडने गट 1 मध्ये अनुक्रमे पहिले आणि दुसरे स्थान मिळवले आहे. गट 1 मधून न्यूझीलंड आणि गट 2 मधून भारत अव्वल स्थानावर आहे. न्यूझीलंड वगळता इतर तिन्ही संघांनी प्रत्येकी एकदा टी 20 वर्ल्ड कपचे जेतेपद पटकावले आहे. टीम इंडियाने एमएम धोनीच्या नेतृत्वाखाली 2007 मध्ये वर्ल्ड कप उंचावला होता. त्या ऐतिहासिक घटनेला यंदा 15 वर्षे होत आहेत. त्यामुळे रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणारा संघ हा दुष्काळ संपवण्याचा जोरदार प्रयत्न करेल अशी आशा चाहत्यांना आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT