पुढारी ऑनलाईन डेस्क : Steve Smith Record Break Century : ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथने द. आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी धडाकेबाज खेळी करून 30 वे शतक झळकावले. यासह त्याने महान दिवंगत क्रिकेटर डॉन ब्रॅडमन यांचा 29 शतकांच्या विक्रम मोडीत काढला. अशी कामगिरी करणारा तो क्रिकेट इतिहासातील 14 वा, तर ऑस्ट्रेलियाचा तिसरा फलंदाज ठरला आहे.
स्मिथने डावाच्या 109 व्या षटकातील चौथ्या चेंडूवर एन्रिक नॉर्टजेला चौकार मारून आपले शतक पूर्ण केले. यासह तो सर्वाधिक धावा करणारा चौथा ऑस्ट्रेलियन फलंदाज ठरला. या यादीत त्याने मायकल क्लार्कला मागे टाकले आहे. सिडनी क्रिकेट मैदानावर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात स्मिथने 192 चेंडूंचा सामना करताना 11 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 104 धावा फटकावल्या.
याशिवाय सर्वात वेगवान 30 शतके करणारा तो दुसरा क्रिकेटपटू ठरला आहे. या प्रकरणात त्याने अनुभवी मॅथ्यू हेडन, रिकी पाँटिंग आणि लिटल मास्टर सुनील गावस्कर यांना मागे टाकले. हेडनने 167 डावात 30, पाँटिंगने 170 आणि गावस्करने 174 डावात शतके झळकावली. स्मिथने 162 डावात 30 शतके झळकावली. या प्रकरणात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने अवघ्या 159 डावात 30 शतके झळकावली आहेत. (Steve Smith Record Break Century)
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत स्मिथ सक्रिय क्रिकेटपटूंमध्ये अव्वल स्थानावर आहे. इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूटच्या नावावर 28, भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीनं 27, न्यूझीलंडचा केन विल्यमसन आणि डेव्हिड वॉर्नरच्या नावावर 25 शतके आहेत. कसोटीत सर्वात जास्त 51 शतके करण्याचा विश्वविक्रम भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. तर स्मिथ हा तिन्ही फॉरमॅटमध्ये सर्वाधिक शतके करणा-या फलंदाजांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. त्याच्या पुढे विराट कोहली (72), डेव्हिड वॉर्नर (45) आणि जो रूट (44) आहेत. स्मिथच्या नावावर 44 शतकांची नोंद झाली आहे.
स्मिथने सिडनी क्रिकेट मैदानावर हजार धावांचा टप्पा ओलांडला. हे त्याचे होम ग्राउंड आहे. या मैदानावर 10 सामने आणि 15 डावांमध्ये स्मिथने 72.64 च्या सरासरीने 1,017 धावा केल्या आहेत. मैदानावरील त्याची सर्वोत्तम धावसंख्या 131 आहे. या ऐतिहासिक मैदानावर त्याने चार शतके आणि सात अर्धशतके झळकावली आहेत. महान ऑस्ट्रेलियन फलंदाज रिकी पाँटिंगने सिदनीमध्ये ऑस्ट्रेलियनकडून सर्वाधिक कसोटी धावा केल्या आहेत. त्याने 16 सामन्यांच्या 27 डावांमध्ये 67.27 च्या सरासरीने 1,480 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर सहा शतके आणि सहा अर्धशतके आहेत. (Steve Smith Record Break Century)
स्मिथ हा कसोटी क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक धावा करणारा चौथा फलंदाज बनला आहे. त्याने याबबतीत माजी कर्णधार मायकेल क्लार्कला (8643) मागे टाकले. स्मिथने 92 सामन्यातील 162 डावांमध्ये 60.89 च्या सरासरीने 8,647 धावा केल्या आहेत. त्याच्या पुढे रिकी पाँटिंग (13,378), अॅलन बॉर्डर (11,174), स्टीव्ह वॉ (10,927) हे आहेत.
सिडनी कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने 4 गडी गमावत 475 धावा केल्या. मॅट रेनशॉ 5 आणि उस्मान ख्वाजा 195 धावा करून खेळत आहेत. स्टीव्ह स्मिथ 104 धावा करून बाद झाला. ट्रॅव्हिस हेडने 70 आणि मार्नस लबुशेनने 79 धावा केल्या. डेव्हिड वॉर्नरने 10 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून एनरिक नॉर्खियाने 2 बळी घेतले. याशिवाय कागिसो रबाडा आणि केशव महाराज यांनी 1-1 विकेट घेतली.