पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएल (IPL 2022)चा १५ वा सीझनला २६ मार्चपासून दणक्यात सुरुवात होणार आहे. जगभरातील लाखो क्रिकेट चाहते आयपीएल सुरू होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. यावेळचा आयपीएल सीझन खूपच रोमांचक असणार आहे कारण यावेळी ८ ऐवजी १० संघ सहभागी होणार आहेत.
आयपीएलची (IPL 2022) अधिकृत प्रसारक वाहिनी स्टार स्पोर्ट्स देखील आयपीएल सामन्यांचे थेट प्रक्षेपण करण्याच्या तयारीत व्यस्त आहे. यंदाचे आयपीएल सुरू होण्यापूर्वी स्टार नेटवर्कने एक मोठा निर्णय घेत सुरेश रैना (Suresh Raina) आणि रवी शास्त्री (ravi shastri) यांचा आयपीएलच्या हिंदी कॉमेंट्री टीममध्ये समावेश केला आहे. डिस्ने स्टारचे सीईओ (स्पोर्ट्स) संजोग गुप्ता यांनी ही माहिती दिली आहे.
संजोग गुप्ता यांनी एका हिंदी वृत्तपत्राला माहिती देताना सांगितले की, 'प्रत्येकाला माहित आहे की यावेळी रैना आयपीएलमध्ये खेळणार नाही, पण आम्हाला त्याला या स्पर्धेशी जोडायचे होते. त्याला मिस्टर आयपीएल म्हटले जाते आणि एकेकाळी तो आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. त्याचे करोडो चाहते आहेत. तर रवी शास्त्री हे पूर्वी आमच्या स्टार स्पोर्ट्स वाहिनीसाठी इंग्रजीत कॉमेंट्री करायचे. २०१७ च्या चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलनंतर त्यांनी आमच्यासाठी कॉमेंट्री केली नाही कारण तो मुख्य प्रशिक्षक म्हणून भारतीय संघात सामील झाले होते.'
संजोग गुप्ता म्हणाले, 'शास्त्रींच्या हिंदी भाषेला मुंबईचा फ्लेवर आहे. सध्या त्यांचे झूमवर हिंदीचे वर्ग सुरू आहेत. त्यांना काही नोट्सही पाठवल्या जात असून ते हिंदी समालोचनाची जोरदार तालीम करत आहेत. आमची अपेक्षा आहे की, हिंदी समालोचन करताना त्यांनी त्यांचे हावभाव जपावेत. तसेच त्यांनी उत्तम हिंदी बोलत बोलतो संवाद साधावा जेणे करून प्रेक्षकांना सामन्याचे समालोचन ऐकताना मजा येईल.'
सुरेश रैना, ज्याची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती, तो आयपीएल 2022 च्या लिलावात विकला गेला नाही. आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक धावा करणाऱ्यांमध्ये रैना चौथ्या क्रमांकावर आहे. रैनाने 205 आयपीएल सामन्यांमध्ये 5,528 धावा केल्या आहेत. त्यांच्या पुढे फक्त विराट कोहली, शिखर धवन आणि रोहित शर्मा आहेत. तो चेन्नई सुपर किंग्जसाठी आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे.
रवी शास्त्रीबद्दल बोलायचे झाल्यास मुख्य प्रशिक्षक म्हणून त्यांचा कार्यकाळ गेल्या वर्षी (२०२१) टी २० (T20) विश्वचषकानंतर संपला. २०१४ मध्ये रवी शास्त्री पहिल्यांदा टीम इंडियाशी डायरेक्टर म्हणून जोडले गेले होते. त्यांचा कार्यकाळ टी-२० विश्वचषक २०१६ पर्यंत होता. यानंतर अनिल कुंबळे यांनी एका वर्षासाठी प्रशिक्षक बनवण्यात आले. २०१७ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाचा पराभव झाल्यानंतर रवी शास्त्री यांची पूर्णवेळ प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
अधिक वाचा :