Latest

सुप्रिया सुळे : ‘सुट्टीला दुबईला न जाता अजिंठा, वेरुळला जा अन् कपडे सोलापूरचे घाला’

अविनाश सुतार

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या संकल्पनेतून मुळेगाव तांड्यामध्ये सुरु केलेल्या ऑपरेशन परिवर्तन उपक्रमास भेट दिली. यावेळी सुळे यांनी बंजारा समाजाच्या महिलांनी शिवणकाम, विणकाम, नक्षीकाम केलेल्या वस्तुंची पाहणी केली. दरम्यान या महिलांच्या कामाचं कौतुक करताना सुळे यांनी 'मेड इन इंडिया' वस्तू वापरण्याचा सल्ला दिला. तसेच सुट्टीला दुबईला न जाता वेरुळ, अजिंठाला जा, आणि कपडे सोलापूरचे घाला, असाही सल्ला त्यांनी यावेळी दिला.

मुळेगाव तांडा येथील अनेक जण दारु निर्मिती करून त्याच्या विक्रीचा व्यवसाय करत होते. मात्र, त्यांचे समुपदेशन करुन पोलीस अधीक्षक सातपुते यांनी ऑपरेशन परिवर्तन राबविला. या माध्यमातून त्यांनी विविध संस्थांना सोबत घेऊन अवैध व्यवसाय सोडलेल्या नागरिकांना रोजगार उपलब्ध करुन दिला. यावेळी सुळेंनी 'मेड इन इंडिया' वस्तू वापरण्याचा सल्ला दिला. मी स्वतः फॉरेनचे कोणतेच कपडे वापरत नाही. मी जे वापरते, ते सर्व मेड इन इंडिया आहे, असे सुळे यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, सोलापुरात राबविलेला उपक्रम ऑपरेशन परिवर्तन हा दिशादर्शक आहे. या उपक्रमाची माहिती गृहमंत्री तसेच वस्त्रोद्योग मंत्रालयाला देणार आहे. या महिलांच्या उद्योगाला चालना मिळवून देण्याचे प्रयत्न करणार असल्याची सुळे यांनी सांगितले. देशात आणि महाराष्ट्रातच जिथे जिथे चांगली कामे होतात. त्याची आपण नोंद घेतली पाहिजे. सातत्याने त्याचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे. आज जे पाहिले ते अप्रतिम होते. या महिलांचे खूप सुंदर काम असल्याचे सुळे म्हणाल्या. महाराष्ट्राच्या पोलिसांचा मला सार्थ अभिमान आहे. मला कधीही एकटीला जाताना भीती वाटत नाही. महाराष्ट्राचे पोलीस हे जबाबदार पोलीस आहेत. त्यांच्याबद्दल मला विश्वास, आदर आणि वर्दीवर प्रेम असल्याचेही सुळे म्हणाल्या.

हेही वाचलंत का ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT