Latest

हिंदू जनआक्रोश रॅलीचे व्हिडिओ शूटिंग करुन रेकॉर्डिंग सादर करा, सर्वोच्च न्यायालयाचे महाराष्ट्र सरकारला आदेश

स्वालिया न. शिकलगार

नवी दिल्ली : येत्या ५ तारखेला मुंबईत होणाऱ्या हिंदू जनआक्रोश रॅलीचे व्हिडिओ शूटिंग करुन त्याबाबतचे रेकॉर्डिंग सादर करा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी महाराष्ट्र सरकारला दिले. याआधी काढण्यात आलेल्या हिंदू जनआक्रोश रॅलीमध्ये मुस्लिम समाजाविरोधात प्रक्षोभक विधाने करण्यात आल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला होता. त्याची दखल घेत न्यायालयाने वरील आदेश दिले.

हिंदू जनआक्रोश रॅलीमध्ये प्रक्षोभक भाषणे होणार नाहीत, तसेच कायदा-सुव्यवस्था बिघडणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश आयोजकांना देण्यात आले आहेत. या अटीवर रॅलीला परवानगी देण्यात आली असल्याची माहिती सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायमूर्ती के. एम. जोसेफ, न्यायमूर्ती अनिरुध्द बोस आणि न्यायमूर्ती ऋषीकेश रॉय यांच्या खंडपीठासमोर दिली. भाजपचे आमदार टी. राजा सिंग तसेच इतर वक्त्यांनी जानेवारीच्या अखेरीस झालेल्या रॅलीवेळी प्रक्षोभक भाषणे केल्याचा आरोप आहे. वरचेवर निर्देश देउनही प्रक्षोभक भाषणे करणाऱ्यांवर कारवाई केली जात नसल्याचे निरीक्षण यावेळी खंडपीठाने नोंदविले.

अॅड. निजाम पाशा तसेच रश्मी सिंग यांनी मध्यस्थींकडून बाजू मांडली. जानेवारीमध्ये झालेल्या हिंदू जनआक्रोश रॅलीवेळी मुस्लिम लोकांचा सामाजिक तसेच आर्थिक बहिष्कार करण्याचे आवाहन करण्यात आले होते, असा दावा त्यांनी केला. या रॅलीस दहा हजार लोक हजर होते, असेही रश्मी सिंग यांनी खंडपीठास दिले.

SCROLL FOR NEXT