Latest

जायकवाडीसाठी ‘सर्वोच्च’ निर्णय बंधनकारक : रावसाहेब दानवे

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; जायकवाडी धरणाचे पाणलोट क्षेत्र कोणते याच्या नोंदी सरकारकडे आहेत. त्यामुळे जायकवाडीत पाणी सोडण्याबाबत मराठवाड्यातील नेत्यांपेक्षा राज्य सरकारचे मत महत्त्वाचे आहे, अशी भूमिका व्यक्त करत जायकवाडीला ८.६ टीएमसी पाणी सोडण्याबाबतचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय सर्वांनाच बंधनकारक असल्याचा दावा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे.

एका शासकीय कार्यक्रमाच्या निमित्ताने गुरुवारी (दि.२३) नाशिक दौऱ्यावर आलेल्या दानवे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जायकवाडी धरणात पाणी सोडण्यावरून पेटलेल्या मराठवाडा विरुद्ध नाशिक-नगर पाणी संघर्षावर भाष्य केले. दानवे म्हणाले की, जायकवाडीत पाणी सोडण्याबाबत मराठवाड्याचे लोकप्रतिनिधी आक्रमक आहेत. परंतु, मराठवाड्याच्या नेत्यांपेक्षा जायकवाडीला पाणी सोडण्याबाबत राज्य सरकारचे काय मत आहे, ते महत्त्वाचे आहे. राज्य सरकारच्या मताचा आधार घेऊन न्यायालयाचे काय मत आहे, त्याला महत्त्व आहे. समन्यायी वाटपानुसार मराठवाड्याकरिता नाशिक व नगरमधील धरणांतून जायकवाडीत ८.६ टीएमसी पाणी सोडले पाहिजे, अशी मराठवाड्यातील नेत्यांची मागणी आहे. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळानेदेखील त्यासंदर्भात निर्देश दिले आहेत. नाशिक व नगरमधून त्यास विरोध झाल्याने आता हे प्रकरण न्यायप्रविष्ट बनले आहे. त्यामुळे न्यायालयाचा निर्णय आता सर्वांसाठी बंधनकारक असल्याचे मत दानवे यांनी व्यक्त केले.

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी सुरू केलेल्या राज्य दौऱ्यावरही दानवे यांनी भाष्य केले. जरांगे-पाटील हे राज्यभर फिरत आहेत, त्यामुळे ते मुंबईतही जाऊ शकतात, असे मत त्यांनी व्यक्त केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बागेश्वर बाबाच्या भेटीवरून टीका करणाऱ्या विरोधकांवरही दानवे यांनी पलटवार केला. धार्मिक कार्यक्रमांना लोकप्रतिनिधींनी आले पाहिजे, अशी लोकांची मागणी असते. त्यामुळे ज्या ठिकाणी लोक असतात, त्या ठिकाणी आम्हाला जावेच लागत. त्यामुळे बागेश्वर बाबा काय आणि प्रदीप मिश्रा काय यांच्या कार्यक्रमाला जाणाऱ्या लोकप्रतिनिधींवर टीका करणे अयोग्य असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.—

ठाकरे बाप-बेट्यांचे रेकॉर्ड आम्ही कधी तपासले का?

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या 'मकाऊ'मधील कॅसिनोतील फोटोवरून सुरू असलेल्या राजकारणावरही दानवे यांनी भाष्य करत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना टोला लगावला. बावनकुळे मकाऊला जाऊन आले ही गोष्ट नवीन नाही; परंतु, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे बाप बेटे, दर पंधरा दिवसाला एखाद्या देशात जाऊन काय काय करतात, त्याचे रेकॉर्ड आम्ही कधी तपासले का? असा सवाल दानवेंनी केला.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT