पुढारी ऑनलाईन डेस्क: गुजरातमध्ये निवडणूक लढवत असलेल्या 'आप'ने एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये चिखलात अडकलेली भाजप प्रचाराची गाडी, काँग्रेसच्या प्रचार करणाऱ्या गाडीने बाहेर काढताना दिसत आहे. हा व्हिडिओ आपल्या ट्विटरवर शेअर करत, 'गुजरात निवडणुकीतील भाजप आणि काँग्रेसची 'आय लव यू' ची कहाणी' असल्याचे म्हणत, भाजप-काँग्रेसला डिवचले आहे.
गुजरात निवडणुकीचे रंग दिवसेंदिवस दिसू लागलेत. यामध्ये सत्ताधारी भाजप आणि आम आदमी पार्टी (आप) मध्ये जोरदार टक्कर पाहायला मिळत आहे. आप ने गुजरात निवडणूक प्रचारात आपल्या विरोधी पक्ष भाजपसोबतच काँग्रेस पक्षावरही निशाना साधला आहे. हा व्हिडिओ शेअर करत आपने भाजप आणि काँग्रेस गुजरात निवडणुकीत एकमेकांच्या कसे प्रेमात आहेत याचे चित्र दाखवले आहे.
गुजरातमध्ये ताकदीने निवडणूक लढवत असलेल्या अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने (आप) गुजरातमधील भाजप आणि काँग्रेस यांच्यातील कथित 'जुगलबंदी'कडे निर्देश करणारा हा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये गुजरातेत भाजपची प्रचार करणारी चिखलात रखडलेले गाडी वाचवण्यासाठी काँग्रेस जोरदार प्रयत्न करत असल्याचे देखील आपने या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे. तसेच भाजप आणि काँग्रेसची ILU ILU…(इलू-इलू, आय लव यू) ची कहाणी असल्याचे म्हटले आहे. या व्हिडिओची चांगलीच चर्चा होत आहे.