Latest

मेहता पब्लिशिंग हाऊसचे सुनील मेहता यांचे निधन

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा

मेहता पब्लिशिंग हाऊसचे व्यवस्थापकीय संचालक आणि अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचे माजी कार्यवाह सुनील अनिल मेहता (वय ५६) यांचे बुधवारी अल्पशा आजाराने निधन झाले. गेले १० दिवस पुण्यातील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. बुधवारी (दि.१२) सायंकाळी चार वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मागे वडील, पत्नी, बहिण आणि दोन मुले असा परिवार आहे.

मराठी प्रकाशन विश्वातील धडाडीचे व्यक्तिमत्व म्हणजे सुनील मेहता. मराठी प्रकाशन विश्वात आंतरराष्ट्रीय पद्धतीने कामकाज चालवण्याची पद्धत मेहता यांनी रूढ केली. १९७६ साली वडील अनिल मेहता यांनी पुण्यात स्थापन केलेल्या 'मेहता पब्लिशिंग हाऊस' या प्रकाशन संस्थेची सगळी सूत्रे १९८६ साली सुनील मेहता यांच्याकडे आली. अल्पावधीतच मेहता यांनी संस्थेला नावारूपास आणले आणि अनेक दिग्गज संस्थेशी जोडले.

मराठीतील दर्जेदार पुस्तकांच्या प्रकाशनासोबतच विविध भाषांमधील पुस्तकांचे अनुवाद मराठीत आणणाऱ्या सुनील मेहता यांनी संस्थेचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवले होते. अनेक आंतरराष्ट्रीय, नामांकित जेफ्री आर्चर, मायकल क्रायटन, फ्रेडरिक फोरसाइथ, रॉबिन कुक, ऍलिस्टर मॅक्लीन, जॉन ग्रिशॅम, इयान फ्लेमिंग, डॅन ब्राऊन, डेबोरा एलिस, ली चाइल्ड झुम्पा लाहिरी यांचे साहित्य मराठीत आणण्यातत्यांचे मोठे योगदान आहे. तर तस्लिमा नासरीन, सुधा मूर्ती, अरुण शौरी, खुशवंत सिंग, चेतन भगत, एस. एल. भैरप्पा, शिवराम कारंथ, गुलजार, दीप्ती नवल, अरुंधती रॉय, ओशो, किरण बेदी अशा लेखकांचे साहित्य त्यांनी मराठीत नावारूपाला आणले. टीबीसी या अभिनव संकल्पनेतून त्यांनी हे अनुवाद मराठी वाचकांपर्यंत पोहचविले.

मराठीतील वि. स. खांडेकर, रणजित देसाई, व. पु. काळे. विश्वास पाटील, शंकर पाटील, द. मा. मिरासदार, आनंद यादव आणि व्यंकटेश माडगुळकर अशा दिग्गज लेखकांचे साहित्य दर्जेदार रुपात मराठी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे काम मेहता यांनी केले. फ्रॅंकफर्ट येथील आंतरराष्ट्रीय बुकफेअरमध्ये सहभाग नोंदवून आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांनी मराठी प्रकाशन विश्वाचे प्रतिनिधित्व केले. प्रकाशन व्यवसायातील नवे आयाम आत्मसात करण्यात मेहता पब्लिशिंग हाऊस आघाडीवर आहे. सुनील मेहता यांनी मराठीत सर्वप्रथम इ-बुक्सचा प्रयोग यशस्वीरित्या राबवला. मेहता पब्लिशिंग हाऊसची दीडहजारहून अधिक पुस्तके इ-बुक स्वरूपात उपलब्ध करण्यात आली आहेत.

नुकत्याच नाशिक येथे पार पडलेल्या साहित्य संमेलनात त्यांनी 'मेहता साहित्योत्सव'चा अभिनव प्रयोग राबविला, ज्यात साहित्यिक कार्यक्रमांसाठी स्वतंत्र स्टॉल घेऊन वाचक आणि लेखकांचा संवाद घडवण्यात आला. त्यांनी अनेक प्रकाशनाचे कार्यक्रम आयोजित केले. २०१२ मध्ये नॉर्वे येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत एकमेव मराठी प्रकाशक म्हणून मेहता यांनी प्रतिनिधित्व केले होते. त्यांना विविध पुरस्काराने गौरविण्यात आले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT