मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मुंबई महानगरपालिकेतील कोविड कंत्राट घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय आणि व्यावसायिक मित्र सुजीत पाटकर यांच्यासह डॉ. किशोर बिसुरे यांना बुधवारी रात्री अटक केली. दोघांचाही गुन्ह्यातील सहभाग उघडकीस आल्यानंतर ईडीने ही कारवाई केली आहे.
कोरोना काळात लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस कंपनीला कोविड सेंटर उभारणी, वैद्यकीय उपकरण आणि औषध खरेदी, डॉक्टर पुरवठा अशी कोट्यावधी रुपयांची कंत्राटे देऊन मोठा आर्थिक घोटाळा करण्यात आल्याचा आरोप भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी करत मुंबई पोलिसांत तक्रार दिली होती. याप्रकरणी मुंबईतील आझाद मैदान पोलीस ठाण्यात लाइफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस फर्म, फर्मचे भागीदार डॉ. हेमंत गुप्ता, सुजित पाटकर, संजय शहा आणि राजू साळुंखे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा पूढील तपासासाठी आर्थिक गुन्हेशाखेकडे वर्ग करण्यात आला.
आर्थिक गुन्हे शाखेने लाइफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेसमधील भागीदारांपैकी एक राजीव ऊर्फ राजू साळुंखे आणि सुनील ऊर्फ बाळा कदम (५८) अशा दोघांना अटक करत मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्यासह अन्य संबंधितांचे जबाब नोंद केले. मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्याच्या आधारे ईडीने मनी लाँड्रिंग कायद्यान्वये गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला. ईडीच्या पथकांनी २१ आणि २२ जूनला घोटाळ्याशी संबंधित असलेल्या सुजीत पाटकर यांच्यासह वरिष्ठ सनदी अधिकारी संजीव जयस्वाल, ठाकरे सेनेचे सचिव सुरज चव्हाण आणि अन्य मनपा अधिकारी, कंत्राटदार, मध्यस्थ अशा संबंधितांच्या घर, कार्यालये आणि मालमत्तांसह पालिकेचे कार्यालय अशा १६ हून अधिक ठिकाणी छापेमारी केली होती.
छापेमारी दरम्यान ईडीच्या हाती महत्वपूर्ण कागदपत्रे आणि दस्तऐवज लागले. त्याआधारे ईडीने संजीव जयस्वाल, सुरज चव्हाण आणि मनपा अधिकारी, कंत्राटदार, मध्यस्थ चाैकशी करुन त्यांचे जबाब नोंदविले आहेत. त्यानंतर आता ईडीने पाटकर आणि डॉ. बिसुरे यांना अटक केली आहे. डॉ. बिसुरे हे दहिसर जंबो कोविड केंद्राचे डीन होते, असे अधिकाऱ्याने सांगितले.
हेही वाचा