Latest

Sugar Price : साखरेने गाठली चाळिशी; क्विंटलमागे एवढे आहेत दर? घ्या जाणून

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा : घाऊक बाजारात वाढत्या दरवाढीत साखरेला मागणी कमी असली तरी सटोडियांच्या सक्रियतेमुळे ऐन सणासुदीत साखरदरात वाढ होत आहे. कारखान्यांवर साखरेच्या निविदा क्विंटलमागे पुन्हा 80 रुपयांनी भडकल्या असून, घाऊक
बाजारात साखरेचे दर क्विंटलला 50 ते 75 रुपयांनी पुन्हा कडाडले असून, दर 3950 ते 4000 रुपयांवर पोहचले आहेत. किरकोळ बाजारात साखरेचे प्रतिकिलोचे दर आता 40 ते 41 रुपयांवर पोहोचल्याने ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. साखरेची ही दरवाढ अशीच सुरू राहण्याचा अंदाज घाऊक बाजारपेठेतील व्यापार्‍यांकडून वर्तविण्यात येत आहे.

केंद्र सरकारने मागील चार महिने मागणीचा विचार करून साखरेचे मुबलक कोटे जाहीर केलेले आहेत. यंदाच्या हंगामात ऊस उत्पादन घटण्याचा प्राथमिक अंदाज असल्याने साखरेचे दर उच्च पातळीवरच राहण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे सट्टेबाजांनी साखर बाजारावर पकड मजबूत करून साखरेची साठवणूक सुरू केली आहे. दरवाढीमुळे कारखानेही वाढीव दरात साखर विक्री खुली ठेवत आहेत. सट्टेबाजांनी मागील काही महिन्यांपासून निविदांमध्ये खरेदी केलेली साखर ही कमी भावाची आहे.

तर सध्या होणार्‍या कारखान्यांवरील साखर निविदांमध्ये ते सक्रिय सहभाग घेत निविदा अनैसर्गिकरीत्या उच्च पातळीवर ठेवून तेच दर वाढवत आहेत. तसेच कमी दरात घेतलेल्या पूर्वीच्या साखरेची सध्याच्या वाढीव दराने विक्री करीत नफा मिळविण्यासाठी सट्टेबाजांबरोबरच साखरेचे काही साठवणूकदार सक्रिय झाल्याचा फटका साखर दरवाढीला बसल्याचे बाजारपेठेतील सूत्रांचे म्हणणे आहे.
केंद्र सरकारने साखर दरवाढीवर लक्ष केंद्रित करताना साखर कारखान्यांनी उत्पादित केलेली साखर, केंद्राने दिलेल्या कोट्यानुसार प्रत्यक्षात विक्री केलेली साखर आणि प्रत्यक्षात सध्याचा शिलकी साखर साठ्यांची तपासणी केल्याशिवाय सट्टेबाजी आणि साठवणूकदारांना चाप बसणार नसल्याचेही सांगण्यात येत आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT