Latest

MAHA Politics : राजकीय स्थैर्य टिकविण्यात महाविकास आघाडीला यश

backup backup

प्रा. प्रकाश पवार : शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांचे महाविकास आघाडी (MAHA Politics) सरकार त्यांच्या कारभाराची दोन वर्षे पूर्ण करत आहे. या दोन वर्षांमध्ये राजकीय स्थैर्य, आरोग्य आणि केंद्र सरकारच्या सत्तेचे प्रभावक्षेत्र हे तीन महत्त्वाचे प्रश्न होते. सरकारचे मूल्यमापन राजकीय स्थैर्य, आरोग्यविषयक आणीबाणीचा पेचप्रसंग आणि केंद्राचे आवाहन अशा निकषांवर करता येईल. या तीन निकषांवर सरकारचा लेखाजोखा मांडता येईल.

राजकीय स्थैर्य

आघाडीचे सरकार (MAHA Politics) या गोष्टीचे मोजमाप राजकीय स्थैर्याच्या आधारे केले जाते. गेल्या दोन वर्षांत या निकषावर आधारित हे सरकार यशस्वी झालेले दिसते. याची तीन कारणे आहेत. एक, तीन पक्षांचे आघाडी सरकार ही गोष्ट फार विशेष नाही. परंतु तीन वेगवेगळ्या विचारसरणीमध्ये वाटाघाटी होऊन सरकार दोन वर्षे यशस्वीपणे राबवले गेले. दोन वर्षांचा कालखंड तसा मोठा कालखंड आहे. कारण शिवसेनेची भूमिका स्थिर राहील, अशी शक्यता कमी होती. तसेच शिवसैनिकांचा कल भाजपकडे झुकलेला होता. त्यामुळे शिवसेना आणि भाजप यांच्यातील समझोता हे एक प्रचंड मोठे आव्हान या सरकारच्या पुढे होते. परंतु मानसिकद़ृष्ट्या आणि संघटनात्मकद़ृष्ट्या शिवसेना भाजपपासून दूर राहिली.

दोन, तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये छुपा संघर्ष होता. या दोन्ही पक्षांतील संघर्ष आजही संपलेला नाही. तरीही सरकार म्हणून या दोन पक्षांनी जुळवून घेतले. हीदेखील या दोन वर्षांतील सरकारच्या स्थैर्याच्या द़ृष्टीने महत्त्वाची कामगिरी ठरते. तीन, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पुढाकार हे सरकार स्थापन करण्यात होता. परंतु तरीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्वतःशीच स्पर्धा होती. राष्ट्रवादी काँग्रेसमधील सर्वोच्च नेतृत्व सरकार स्थापन करण्याच्या आधी भाजपशी जुळवून घेत होते.

यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अंतर्गत, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसमध्ये आणि शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजकीय विश्वासार्हता फारच नाजूक बाब झाली होती. परंतु गेल्या दोन वर्षांत राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतःवर नियंत्रण मिळवले. यामुळे एकूणच आघाडी म्हणून नैतिकतेत वाढ झाली. आघाडीमध्ये भविष्यात एकत्रित राहण्याबद्दल गेल्या दोन वर्षांत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने एक प्रकारचा संवाद घडवला. या अर्थाने सरकारने सावळागोंधळ नियंत्रणात आणला. सावळागोंधळ नियंत्रणात आणता येतो हीच सरकारची या दोन वर्षांतील महत्त्वाची कामगिरी ठरते.

आरोग्यविषयक आणीबाणी

तीन पक्षाच्या (MAHA Politics) अंतर्गत राजकीय अस्थैर्याचा एक मुद्दा होता. त्या मुद्द्यावर सरकार मात करत होते. त्या दरम्यान आरोग्य आणीबाणीचा प्रश्न निर्माण झाला. जवळपास उद्धव ठाकरे सरकारचा सर्व कालखंड आरोग्यविषयक प्रश्न सोडवण्यात गेला. या दोन वर्षांत हा या सरकारपुढील हिमालयापेक्षा मोठा प्रश्न होता. हा प्रश्न या सरकारने सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. यामुळे या दोन वर्षांत सरकारच्या पदरात तीन गोष्टी पडल्या.

एक, आरोग्य प्रश्न सोडविण्यासाठी या सरकारकडे तीव्र इच्छाशक्ती आहे. ही गोष्ट कमीत कमी भाजपेतर मतदार आणि संघटनांच्या लक्षात आली. यामुळे या सरकारचा आत्मविश्वास वाढला. दोन, आरोग्यविषयक राष्ट्रीय पातळीवरील संस्थांनी मुख्यमंत्र्यांच्या कामाचे योग्य म्हणून समर्थन केले. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाला एक प्रकारची अधिमान्यता मिळत गेली. तीन, आरोग्य क्षेत्रातील राजेश टोपे यांची कामगिरी जनसमूहाने चांगली म्हणून मान्य केली.

केंद्र सरकारचे आव्हान

राज्यातील महाविकास आघाडी सरकारची स्थापना देवेंद्र फडणवीस विरोधातून झाली होती. यामुळे या सरकारला देवेंद्र फडणवीस यांचा विरोध होणार होता. परंतु दुसरा मोठा विरोध केंद्र सरकारचा होता. असे असूनही केंद्र सरकार या दोन वर्षांत राज्यातील आघाडी सरकारच्या विरोधात फार गंभीरपणे गेले नाही. नागरी समाजातील काही वाद झाले. परंतु तरीही सरकारची प्रतिमा खराब झाली नाही. नैतिकतेचे काही मुद्दे मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांच्या बद्दल उभे राहिले. बदनामीकरण चळवळींचा सरकारवर किरकोळ परिणाम झाला.

भ्रष्टाचारविरोधी आंदोलन सुरू झाले. परंतु भ्रष्टाचारविरोधी आंदोलन जनआंदोलन या स्वरूपाकडे वळले नाही. या दोन वर्षांच्या काळात विरोधी पक्ष म्हणून फडणवीस यांनी सरकारला सळो की पळो केले. यामुळे एका अर्थाने या दोन वर्षांत आघाडी सरकारला मनमानी पद्धतीने कारभार करण्यापासून रोखले गेले. सत्ताधारी पक्षांच्या कारभाराबरोबर विरोधी पक्ष नेतृत्वाच्या विरोधाची धार या काळात दिसत राहिली.

आघाडी सरकारची राज्यकारभारावरची पकड चांगली आहे. परंतु त्याबरोबरच विरोधी पक्षाला मिळणारा पाठिंबाही चांगला आहे. यामुळे एका अर्थाने लोकशाही प्रक्रियेतील काही गोष्टी या काळात घडत गेल्या. म्हणून आघाडी सरकारांच्या इतिहासातील हा एक महत्त्वाचा टप्पा ओळखला जाईल. असा प्रयोग घडणे अवघड असते. परंतु तो दोन वर्षांत यशस्वी झाला. हा मुद्दा ही महाराष्ट्राच्या इतिहासात पुढे दखलपात्र ठरेल.

(लेखक ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आहेत)

हे वाचलंत का? 

SCROLL FOR NEXT