Latest

नागपूर : खासगी बसेससाठी आता कठोर नियमावली, बसमध्ये ड्रायव्हरचा लागणार फोटो !

दिनेश चोरगे

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : समृद्धीवर बेशिस्त चालकाचा व्हायरल झालेला व्हिडीओ, खासगी बसगाड्यांचे वाढते अपघात लक्षात घेऊन राज्य परिवहन विभागाने आता महत्वाचे निर्णय घेतले आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी विमानाप्रमाणे खासगी बसेसमध्येही सुरक्षिततेच्या सूचना देण्यात येणार आहेत. प्रवाशांनी आपात्कालीन परिस्थितीत काय करावे, काय करू नये याची सुचना प्रवाशांना देणे खाजगी बस संचालकांनाही बंधनकारक करण्यात येणार आहे. इतकेच नव्हे तर लांब पल्ल्याच्या खासगी बसेस, ट्रॅव्हल्सच्या ड्रायव्हरचा फोटो, मोबाईल क्रमांक बसच्या दर्शनी भागात लावणे अनिवार्य असणार आहे.

प्रादेशिक परिवहन विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवाशांच्या सुरक्षेसाठी काही महत्वाचे निर्णय आरटीओने घेतले आहेत. प्रायोगिक तत्वावर राज्यात आधी नागपूरला त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. या नियमावलीत बसच्या दर्शनी भागात बस चालकाचा फोटो, मोबाईल क्रमांक, बस कंपनीचा कार्यालय दूरध्वनी क्रमांक, बसच्या फिटनेस संदर्भातली माहिती स्टिकर स्वरूपात लावणे बंधनकारक असणार आहे. त्याचप्रमाणे आपात्कालीन परिस्थितीत प्रवाशांनी काय करावे, याबाबत सुचनाही प्रवाशांना देण्यात येतील. रातराणी गाड्यांमध्ये प्रवासी साखरझोपेत असताना ट्रॅव्हल्स बसचालक मद्यपान करून वाहन चालवणे, वाहनात भ्रमणध्वनीचा वापर, महिला प्रवाशांसोबत गैरवर्तन अशा बऱ्याच घटना घडल्या आहेत. नुकताच एक खासगी बसचालक हा बस चालवताना भ्रमणध्वनीवर चित्रपट बघत असल्याचे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. यामुळे जनजागृती सोबतच संबंधित चालकांवर कारवाईचे संकेत उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी नागपुरात दिले होते.

यानंतरच हा सर्व गैरप्रकार थांबवण्यासाठी नागपुरात शहर पोलीस, प्रादेशिक परिवहन विभागाकडून संयुक्तरित्या एक अभिनव प्रकल्पावर काम सुरू आहे. कुणाला बसचालक वा बसमधील सोयीसुविधेची तक्रार असल्यास ते नावानिशी संबंधित यंत्रणेकडे तक्रार करू शकतील. यामुळे गैरप्रकारांना आळा बसेल, असे बोलले जात आहे. ट्रॅव्हल्स संचालकांनीही अनुकूलता दर्शवली असून शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी खासगी 'ट्रॅव्हल्स'च्या दर्शनी भागात त्यातील चालकाचे छायाचित्रासह सर्व माहिती लावण्याच्या सूचना १ नोव्हेंबरच्या बैठकीत केल्या. या नियमांचे काटेकोर पालन न झाल्यास बसचालकाकडून काही अनुचित घडल्यास त्याची तक्रार करता येणार असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (पूर्व नागपूर कार्यालय ) रवींद्र भुयार यांनी दिली.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT