Latest

सिंहगड घाटात विक्रेत्याची गळफास घेऊन आत्महत्या

अमृता चौगुले

वेल्हे : पुढारी वृत्तसेवा

सिंहगड किल्ल्याच्या घाट रस्त्यावरील वनखात्याच्या चिंचेच्या बनात एका झाडाला गळफास घेऊन विलास तुकाराम खामकर (वय ४६, रा.आणकरवाडी, घेरा सिंहगड) या लिंबू सरबत विक्रेत्याने आत्महत्या केली. हा प्रकार गुरुवारी (दि. २) सकाळी साडे सात वाजेच्या सुमारास उघडकीस आला.

विलास खामकर याच्या आत्महतेचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात नेण्यात आला आहे. या प्रकरणी तपास सुरू आहे, असे हवेली पोलिसांनी सांगितले. मयत विलास याच्या मागे आई, वडील, पत्नी, मुले असा परिवार आहे.

विलास अतकरवाडी येथील सिंहगडावर जाणाऱ्या पाऊलवाटेवर लिंबू सरबत विक्री करत असे. त्यावर त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू होता. बुधवारी (दि. १) विलास याचा वाढदिवस होता. घरात त्याचे किरकोळ वाद झाले. त्यानंतर तो घरातून निघून गेला. गुरुवारी सकाळी सिंहगड घाट रस्त्यावर गोळेवाडीपासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या चिंचेच्या बनात ग्लेशियर झाडाला दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत एका व्यक्तीचा मृतदेह लटकत असल्याची माहिती वनखात्याच्या सुरक्षा रक्षकांना मिळाली.

त्यानंतर सुरक्षा रक्षक लव्हु पवार, नितीन गोळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी विलास याचे वडील तुकाराम खामकर सिंहगडावर चालले होते. त्यांनी विलास याला ओळखले. हवेली पोलिस ठाण्याचे जवान दिपक गायकवाड यांनी पोलीस पाटील निलेश चव्हाण व नागरिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला.

आठवड्यात दोन विक्रेत्यांची आत्महत्या

सिंहगडावर दही-ताक विकणाऱ्या सिंहगड पायथ्याच्या एका विक्रेत्याने गेल्या आठवड्यात घरात आत्महत्या केली होती. त्यानंतर आज पुन्हा एका विक्रेत्यांने आत्महत्या केली.

SCROLL FOR NEXT