मान्सून गोव्याच्या दक्षिण सीमेवर! | पुढारी | पुढारी

मान्सून गोव्याच्या दक्षिण सीमेवर! | पुढारी

सिंधुदुर्ग : पुढारी वृत्तसेवा ;गुरुवारी, 3 जून रोजी केरळात दाखल झालेल्या मान्सूनने पुढच्या 24 तासांत खूपच मजल मारली. संपूर्ण केरळ, कर्नाटक राज्यांचा बराचसा भाग आणि तामिळनाडू राज्याचाही बहुतांश भाग मान्सूनने व्यापल्याचे भारतीय हवामान विभागाने मान्सून मॅपद्वारे जाहीर केले आहे. शुक्रवारी, 4 जून रोजी मान्सून गोव्याच्या दक्षिण सीमेवर पोहोचल्याचेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. 

शुक्रवारी भारतीय हवामान विभागाने मान्सून मॅप जाहीर केला आहे. 21 मे रोजी अंदमान-निकोबार बेटावर वर्दी दिलेल्या मान्सूनला प्रत्यक्षात श्रीलंकेला व्यापून भारताच्या दक्षिण सीमेवरील केरळ-कन्याकुमारी येथे पोहोचण्यास 3 जून ही तारीख उजाडली. हा मान्सूनचा प्रवास तसा खूपच धीमा होता. मान्सूनच्या नॉर्मल कॅलेंडरनुसार मान्सूनची केरळमधील एन्ट्री 1 जून रोजी होते. ती यावर्षी दोन दिवसांनी उशिरा झाली. 

मात्र, पुढील 24 तासात मान्सूनने सुपरफास्ट प्रवास करत भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर केरळ आणि कर्नाटक ही राज्ये ओलांडून गोव्याची दक्षिण सीमा गाठली आहे. एकीकडे पश्चिम किनारपट्टीवर मान्सूनचा सुपरफास्ट प्रवास असताना तिकडे पूर्व किनारपट्टीवरील मान्सूनचा वेग मात्र खूपच कमी आहे. मान्सूनच्या नॉर्मल कॅलेंडरनुसार 5 तारखेला मान्सून इशान्य भारतात आसामपर्यंत पोहोचणे अपेक्षीत होते. मात्र शुक्रवारी 4 तारखेला तो अंदमान-निकोबार बेटाच्या उत्तरेला रेंगाळत असल्याचे हवामान विभागाच्या मान्सून मॅपने स्पष्ट केले आहे. 

आता हा मान्सून तळकोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर कधी दाखल होईल याची उत्सुकता कोकणवासीयांना लागून राहिली आहे. गोवा राज्य पार करून हा मान्सून जेव्हा सिंधुदुर्गात दाखल होईल तीच त्याची महाराष्ट्रातील एन्ट्री असेल. सध्यातरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक प्रमाणात पावसाची रिमझिम दिसते. शुक्रवारी दिवसभर अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण होते. 

12 जूनपासून सरीवर सरी…

स्कायमेट वेदर या हवामान विषयक खासगी संस्थेने आपला पुढील पंधरा दिवसांचा वेदर मॅप जारी केला आहे. त्यानुसार शनिवारी, 5 जूनपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात मान्सूनपूर्व पाऊस कमीच राहील. त्यानंतर मृग नक्षत्रातही फारसा पाऊस पडणार नाही. मात्र, त्यानंतर 12 जूनपासून सरींवर सरी पाऊस कोसळेल, असे या वेदर मॅपद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे. पाऊस कोणत्याही क्षणी सुरू होईल, असे गृहीत धरून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सध्या भात पेरणी व इतर कामांना जोरदार सुरुवात केली आहे.

केरळ, कर्नाटक, तामिळनाडूत

पर्जन्यवृष्टी तळकोकणाला प्रतीक्षा

Back to top button