Latest

Stock Market Updates | बाजाराचा मूड बिघडला! सेन्सेक्स- निफ्टी घसरले, काही क्षणात उडाले ४ लाख कोटी

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन : कमकुवत जागतिक संकेतांदरम्यान बुधवारी शेअर बाजाराची सुरुवात मोठ्या घसरणीने झाली. बाजार खुला होताच सेन्सेक्स ७०० अंकांनी कोसळून ७०,८५० पर्यंत खाली आला. तर निफ्टी १९८ अंकांनी घसरून २१,५५० च्या खाली आला. त्यानंतर सकाळी १० वाजता सेन्सेक्स ५०० अंकांच्या घसरणीसह ७१,०५१ वर होता. तर निफ्टी १३० अंकांनी घसरून २१,६०० वर व्यवहार करत होता. बाजारात चौफेर विक्री सुरु आहे. विशेषतः आयटी शेअर्समध्ये सर्वाधिक विक्रीचा मारा दिसून येत आहे. (Stock Market Updates)

सेन्सेक्स आज ७१ हजारांवर खुला झाला. त्यानंतर तो ७१ हजारांच्या खाली आला. सेन्सेक्सवर इन्फोसिस, टेक महिंद्रा, विप्रो, एचडीएफसी बँक, टीसीएस, एलटी, जेएसडब्ल्यू स्टील, अल्ट्राटेक सिमेंट, सन फार्मा, पॉवर ग्रिड, इंडसइंड बँक, एचसीएल टेक हे शेअर्स सर्वाधिक घसरले आहेत. तर ॲक्सिस बँक, मारुती, एम अँड एम या शेअर्समध्ये किरकोळ‍ वाढ दिसून येत आहे.

निफ्टीवर इन्फोसिस, टेक महिंद्रा, विप्रो, एचडीएफसी बँक, सिप्ला हे घसरले आहेत. तर बजाज ऑटो, आयशर मोटर्स, अदानी एंटरप्रायजेस, कोल इंडिया हे वाढले आहेत.

गुंतवणूकदारांना ४ लाख कोटींचा फटका

बाजारातील आजच्या सुरुवातीच्या घसरणीमुळे बीएसई सूचीबद्ध कंपन्यांच्या बाजारात भांडवलात सुमारे ४ लाख कोटींची घट झाली. १३ फेब्रुवारी रोजी बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल ३,८०,७५,८७२.३५ कोटी रुपये होते. आज १४ फेब्रुवारी हे बाजार भांडवल ३,७६,६६,३०७.६२ कोटी रुपयांवर आले. याचाच अर्थ गुंतवणूकदारांना ४,०९,५६४.७३ कोटी रुपयांचा फटका बसला.

अमेरिकेतील महागाईच्या आकडेवारीने बाजाराचा मूड बिघडला

जगभरातील बाजारांचा मूड अमेरिकेतील महागाईच्या आकड्याने बिघडला आहे. मंगळवारी अमेरिकेतील डाऊ जोन्स इंडस्ट्रियल अव्हरेज निर्देशांक (Dow Jones Industrial Average) ५२५ अंकांनी म्हणजेच १.४ टक्क्यांनी घसरला. डाऊ जोन्सची मार्च २०२३ नंतरची ही सर्वात मोठी एक दिवसीय घसरण राहिली. ब्लू-चिप इंडेक्स त्याच्या सत्रातील निचांकी स्तरावर ७०० पेक्षा जास्त अंकांनी घसरला. S&P 500 मध्ये १.४ टक्क्यांची घसरण झाली आणि Nasdaq Composite सुमारे १.८ टक्क्यांनी खाली आला. अमेरिकेनंतर आशियाई बाजारातही घसरण झाली आहे. जपानचा निक्केई १ टक्क्यांनी घसरला आहे. (Stock Market Updates)

मंगळवार अमेरिकेच्या श्रम सांख्यिकी ब्युरोने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, जानेवारीमध्ये संपलेल्या १२ महिन्यांत किमती ३.१ टक्क्यांनी वाढल्याचे ताज्या ग्राहक किंमत निर्देशांकातून समोर आले आहे. मासिक आधारावर CPI गेल्या महिन्यात ०.३ टक्क्यांनी वाढला आहे. महागाईच्या या आकडेवारीने उच्च व्याजदर कायम राहणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. यामुळे गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतला आहे.

हे ही वाचा ;

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT