Latest

Stock Market Updates | सेन्सेक्सची ६२,७०० वर गवसणी! निफ्टीनेही गाठला सर्वकालीन उच्चांक, हे ४ मुद्दे ठरले महत्त्वाचे

दीपक दि. भांदिगरे

Stock Market Updates : जागतिक बाजारातील कमकुवत संकेतांमुळे आज भारतीय शेअर बाजाराची सुरुवात घसरणीने झाली होती. झिरो-कोविड धोरणाविरुद्ध चीनमधील प्रमुख शहरांमध्ये झालेल्या विरोधांमुळे गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतली. यामुळे आशियाई बाजारात हाहाकार उडाला आणि बहुतांश शेअर्स घसरले. दरम्यान, यातून आज भारतीय शेअर बाजाराने सावरत उसळी घेतली. सोमवारी सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स, निफ्टीत घसरण दिसून आली होती. त्यानंतर काहीवेळातच दोन्ही निर्देशांक सावरले आणि त्यांच्यात तेजी आली. सेन्सेक्स २११ अंकांनी वाढून ६२,५०४ वर बंद झाला. तर निफ्टी ५० अंकांनी वाढून १८,५६२ वर बंद झाला.

दुपारी दोनच्या सुमारास सेन्सेक्सने ६२,७०० वर उसळी उच्चांक गाठला होता. तर निफ्टीने १८,६०० वर झेप घेतली होती. सेन्सेक्सचा हा नवा उच्चांक आहे. बीपीसीएल, रिलायन्स, हिरो मोटाकॉर्प, अशियन पेंट्स, इंडसइंड बँक यांचे शेअर्स आघाडीवर होते. तर निफ्टीनेही आज सर्वकालीन उच्चांक गाठला. भारतीय अर्थव्यवस्थेची सुदृढ स्थिती आणि तेलाच्या किमतीत झालेली सुधारणा हे भारतीय शेअर्स बाजारासाठी मोठे सकारात्मक कारण ठरले.

रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL NSE ३.७८ टक्के) तसेच बँकिंग आणि IT समभागांच्या खरेदीच्या जोरावर निफ्टीने सोमवारी १८,६०४ चा सर्वकालीन उच्चांक गाठला. निफ्टीने १७ जून रोजी १५,१८३ हा ५२ आठवड्यांचा निचांक गाठला होता. त्यानंतर निफ्टीने काही महिन्यांतच २२ टक्क्यांपेक्षा अधिक वाढ नोंदवली. तर बीएसईच्या ३० शेअर्सच्या सेन्सेक्सने ६२,७०१ वर मजल मारली.

हिंदाल्को, जेएसडब्ल्यू स्टील, अपोलो हॉस्पिटल्स, एचडीएफसी आणि एचडीएफसी बँक आदींचे शेअर्स आज NSE प्लॅटफॉर्मवर मागे पडलेले दिसले. त्यांचे शेअर्स २.२१ टक्क्यांपर्यंत खाली आले. याउलट हिरो मोटोकॉर्प, बीपीसीएल, बजाज ऑटो, एसबीआय लाइफ आणि टाटा मोटर्स यांचे शेअर्स आघाडीवर होते. (Stock Market Updates)

आशियाई शेअर बाजारांवर नजर टाकली तर जपानचा निक्केई निर्देशांक ०.७० टक्क्यांनी घसरला. दक्षिण कोरियाचा KOSPI १.०८ टक्क्यांनी आणि शांघाय कंपोझिट निर्देशांक १.१५ टक्क्यांनी घसरला. हाँगकाँगचा हँगसेंग निर्देशांक २.५९ टक्क्यांनी घसरला. तर अमेरिकेतील तीनही प्रमुख निर्देशांक उच्च पातळीवर स्थिरावले.

फेडरल रिझर्व्ह करेल कमी दरवाढ

अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह दरवाढीची गती नियंत्रित करण्यास सुरवात करेल. या शक्यतेने तसेच फेडरल रिझर्व्हच्या नोव्हेंबरच्या पतधोरण बैठकीच्या पार्श्वभूमीवर भारतातच नव्हे तर जागतिक स्तरावर स्टॉक्सना आधार मिळाला. आर्थिक विश्लेषक आता डिसेंबरच्या बैठकीत अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेकडून ५० बेसिस पॉईंट दरवाढीचा विचार करीत आहेत. याआधीची दरवाढ अधिक होती.

कच्च्या तेलाच्या किमती

ब्रेंट क्रूड तेलाच्या किमती प्रति बॅरल ८० डॉलर पर्यंत घसरल्या आहेत, जी या वर्षीच्या जानेवारीपासूनची सर्वात कमी पातळी आहे. चीनच्या कडक कोविड-१९ लॉकडाउनमुळे मागणीवर परिणाम होईल अशी चिंता व्यापाऱ्यांना वाटत आहे. दुसरीकडे, युरोप आणि अमेरिकेत आर्थिक मंदीचे सावट आहे. तेलाच्या किमतीतील घसरण भारताच्या तेल आयातीवर अवलंबून असलेल्या अर्थव्यवस्थेसाठी सकारात्मक बाब आहे.

डॉलर कमकुवत

अमेरिकी डॉलर कमकुवत झाला आहे. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया आता ८२ च्या वर आहे. अमेरिकी डॉलर निर्देशांकाने ११४.७८ हा उच्चांक गाठला होता. आता तो १०६ स्तरांच्या खाली आला आहे.

परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांचा ओघ वाढला

या महिन्यात भारतीय शेअर बाजारात परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांकडून गुंतवणुकीचा ओघ वाढला आहे. यामुळे बाजारातील तेजीचे हे एक कारण आहे. परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (FIIs) नोव्हेंबरमध्ये आतापर्यंत सुमारे ४ अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे. जरी देशांतर्गत संस्था या महिन्यात FII प्रवाहाचा फायदा घेत निव्वळ विक्रेते वळत आहेत, परंतु अलीकडच्या काही महिन्यांपासून ते सातत्याने घट खरेदी करत आहेत.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT