Latest

Stock Market Updates | बाजारात सलग तिसऱ्या दिवशी रेकॉर्डब्रेक तेजी, सेन्सेक्स ६९,६०० पार, निफ्टी २१ हजारांजवळ

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन : भारतीय शेअर बाजार आज बुधवारी (दि.६) सलग तिसऱ्या दिवशी रेकॉर्डब्रेक तेजीसह खुला झाला. यूएस फेडरल रिझर्व्ह मार्चमध्ये व्याजदरात कपात करेल या शक्यतेला ताज्या रोजगार आकडेवारीने बळ दिल्याने भारतीय इक्विटी निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी बुधवारी सलग तिसऱ्या सत्रात नवीन विक्रमी उच्चांकावर खुले झाले. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्सने ३६० अंकांनी वाढून ६९,६०० चा टप्पा पार केला. तर निफ्टीने ९० अंकांच्या वाढीसह २०,९४५ वर झेप घेतली. (Stock Market Updates)

संबंधित बातम्या 

सेन्सेक्स आज ६९,५३४ वर खुला झाला. त्यानंतर तो ६९,६७३ पर्यंत वाढला. सेन्सेक्सवर विप्रो, आयटीसी, एशियन पेंट्स, नेस्ले इंडिया, टीसीएस, बजाज फायनान्स, रिलायन्स, एचसीएल टेक, टेक महिंद्रा, एम अँड एम, पॉवर ग्रिड हे शेअर्स वाढले आहेत. तर एनटीपीसी, आयसीआयसीआय बँक, भारती एअरटेल, कोटक बँक, ॲक्सिस बँक, टाटा स्टील हे शेअर्स घसरले आहेत.

अदानी शेअर्समध्ये तेजी कायम

अदानी शेअर्समधील तेजी बुधवारीही कायम राहिली आहे. अदानी समूहाची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसचा शेअर सुमारे ५ टक्के वाढून ३,११२ रुपयांवर पोहोचला, तर अदानी ग्रीन एनर्जी १६ टक्क्यांनी वाढला आहे. अदानी एनर्जी सोल्युशन्स, अदानी टोटल गॅस आणि एनडीटीव्ही हे शेअर्स १० ते १६ टक्क्यांदरम्यान वाढले आहेत. अदानी पोर्ट्स आणि अदानी पॉवर अनुक्रमे ५ टक्के आणि ८ टक्क्यांनी वाढले आहेत.

कामगार विभागाच्या आकडेवारीत ऑक्टोबरच्या अखेरीस ६ लाखांहून अधिक नोकऱ्यांच्या संधींमध्ये घट दर्शविली आहे. ज्यातून अमेरिकेची अर्थव्यवस्था थंडावत असल्याचे संकेत मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर यूएस फेड व्याजदरात कपात करण्याची शक्यता वाढली आहे. याचे सकारात्मक पडसाद बाजारात दिसून येत आहेत.

आशियाई बाजारातही तेजीचा माहौल

आशियाई बाजारातही तेजीचा माहौल आहे. जपानचा निक्केई निर्देशांक १.६ टक्क्यांनी वाढून व्यवहार करत आहे. दक्षिण कोरियाचा कोस्पीही ०.५६ टक्क्यांनी वधारला आहे. काल अमेरिकेच्या बाजारातील निर्देशांक वाढून बंद झाले होते.

SCROLL FOR NEXT