Latest

Stock Market Opening Bell | शेअर बाजाराची रेकॉर्ड ब्रेक कामगिरी, सेन्सेक्स ६७ हजार पार, निफ्टी १९,८०० वर

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन : मजबूत जागतिक संकेतांमुळे भारतीय शेअर बाजारात तेजी कायम आहे. आज बुधवारी सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्सने २८० अंकांनी वाढून ६७ हजारांवर झेप घेत नवा उच्चांक गाठला. तर निफ्टी १९,८०० वर पोहोचला. (Stock Market Opening Bell) गेल्या काही दिवसांत शेअर बाजाराची घौडदौड सुरु आहे. आज बाजारातील तेजीत आयटी आणि बँकिंग स्टॉक्स आघाडीवर आहेत.

काल सेन्सेक्स ६६,७९५ वर बंद झाला होता. आज तो ६६,९०५ वर खुला झाला. त्यानंतर त्याने ६७,०८८ पर्यंत झेप घेतली. सेन्सेक्सवर एनटीपीसी, इंडसइंड बँक, पॉवर ग्रिड, इन्फोसिस, टेक महिंद्रा, विप्रो, सन फार्मा हे शेअर्स वाढले आहेत. तर मारुती, एम अँड एम, एशियन पेंट्स, टीसीएस हे शेअर्स घसरले आहेत.

बाजारात चौफेर खरेदी पाहायला मिळत आहे. जागतिक बाजारातून मजबूत संकेत, जून तिमाहीतील कंपन्यांची चांगली कामगिरी, हेवीवेट स्टॉक्समध्ये जोरदार खरेदी आदींमुळे शेअर बाजाराने उसळी घेतली आहे.

क्षेत्रीयमध्ये ऑटो वगळता इतर सर्व निर्देशांक हिरव्या चिन्हात व्यवहार करत आहेत. पॉवर निर्देशांक १ टक्के, रियल्टी ०.५ टक्‍क्‍यांनी वाढला आहे. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक प्रत्येकी ०.४ टक्क्यांनी वधारले आहेत.

निफ्टीवर इंडसइंड बँक, एनटीपीसी, इन्फोसिस, टेक महिंद्रा, अपोलो हॉस्पिटल्स हे शेअर्स वाढले आहेत. तर हिंदाल्को इंडस्ट्रीज, आयशर मोटर्स, सिप्ला, नेस्ले इंडिया आणि एमअँडएम घसरले आहेत. (Stock Market Opening Bell)

जागतिक बाजारातील स्थिती

अमेरिकेतील मॉर्गन स्टॅनली, बँक ऑफ अमेरिका कमाईच्या अंदाजात अव्वल स्थानी आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील डाऊ जोन्स निर्देशांकाने सलग सातव्या सत्रात वाढ नोंदवली. आशियाई बाजारातही तेजीचे वारे आहे. जपानचा निक्केई निर्देशांक दोन आठवड्यांच्या उच्चांकावर पोहचला आहे. तर हाँगकाँगचा हँग सेंग १.३ टक्क्यांनी वाढला आहे.

परदेशी गुंतवणूकदारांकडून गुंतवणूक

गेल्या ११ ट्रेडिंग सत्रांत परदेशी गुंतवणूकदारांची भारतीय बाजारात गुंतवणूक राहिली आहे. त्यांनी या सत्रांत बल्क डील वगळून केवळ शेअर बाजारात १५,१५६ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. याउलट गेल्या १२ पैकी ८ सत्रांत देशांतर्गत गुंतवणूकदारांनी (DII) ७,८६८ कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली आहे.

 हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT