पुढारी ऑनलाईन डेस्क : मजबूत जागतिक संकेतांमुळे तेजीत सुरुवात केलेला शेअर बाजार आज बुधवारी बंद होताना सपाट झाला. सेन्सेक्स ११ अंकांच्या किरकोळ वाढीसह ६५,०८७ वर बंद झाला. तर निफ्टी १९,३४७ वर स्थिरावला. सेन्सेक्स आज ६५,३११ वर खुला झाला होता. त्यानंतर तो ६५,४५८ पर्यंत वाढला. पण बंद तो ६५ हजारांवर बंद झाला. याचाच अर्थ आज दिवसाच्या उच्चांकावरून सेन्सेक्स सुमारे ३५० अंकांनी खाली आला. (Stock Market Closing Bell)
क्षेत्रीय पातळीवर रियल्टी निर्देशांक १ टक्क्याने वाढला. तर ऑटो, एफएमसीजी, आयटी, मेटल प्रत्येकी ०.५ टक्क्यांनी वाढले. दरम्यान, पॉवर, ऑईल आणि गॅस, बँकिंग प्रत्येकी ०.५ टक्क्यांनी खाली आले. बीएसई मिडकॅप ०.५ टक्के आणि स्मॉलकॅप निर्देशांक ०.८ टक्क्यांनी वधारला.
सेन्सेक्सवर जियो फायनान्सियल सर्व्हिसेसचा शेअर टॉप गेनर आहे. हा शेअर ५ टक्के वाढून २३२ रुपयांवर पोहोचला. त्यापाठोपाठ टाटा स्टील, मारुती, एम अँड एम, इन्फोसिस, एचसीएल टेक हे शेअर्स १ ते २ टक्क्यांपर्यंत वाढले. अल्ट्राटेक सिमेंट, नेस्ले इंडिया, आयटीसी, जेएसडब्ल्यू स्टील हे शेअर्सही वधारले. तर पॉवर ग्रिड हा शेअर टॉप लूजर ठरला. हा शेअर १.५३ टक्के घसरून २४७ रुपयांपर्यंत खाली आला. एसबीआय, आयसीआयसीआय, एचडीएफसी बँक, इंडसइंड बँक हे शेअर्स घसरले.
फूड डिलिव्हरी ॲप झोमॅटोच्या शेअर्सने (Shares of Zomato) बुधवारी ५ टक्के वाढून ९९.६० रुपयांवर पोहोचला. काल हा शेअर ९४ रुपयांवर स्थिरावला होता. या वर्षी जानेवारीत हा शेअर ४४.३५ रुपयांपर्यंत खाली आला होता. या निचांकी पातळीवरून हा शेअर सुमारे १२५ टक्क्यांनी वाढला आहे. ब्लॉक डीलनंतर हा शेअर वधारला आहे.
स्टॉक एक्सचेंजच्या आकडेवारीनुसारस, परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी मंगळवारी ६१.५ कोटी रुपयांचे शेअर्स, तर देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांनी ३०५ कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले.
जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था अमेरिकेने मंदीचे संकेत दिल्यानंतर फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर वाढीची चिंता कमी झाली आहे. या पार्श्वभूमीवर आशियाई शेअर बाजारात तेजी राहिली. आज जपान आणि हाँगकाँगसह इतर आशियाई बाजारांमध्ये किरकोळ वाढ दिसून आली. मंगळवारी युरोप आणि अमेरिकेतील निर्देशांक वाढून बंद झाले होते. (Stock Market Closing Bell)
हे ही वाचा :