Latest

Stock Market Closing Bell | सेन्सेक्स ६६ हजार पार, IT मध्ये बंपर तेजी, ‘हे’ ५ घटक ठरले महत्त्वाचे

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन : जागतिक बाजारातील सकारात्मक संकेतांचा मागोवा घेत भारतीय शेअर बाजारातील सेन्सेक्सने आज इतिहास रचला. गुरुवारच्या ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्सने विक्रमी ६६ हजार अंकाला गवसणी घातली. तर निफ्टी १९,५५० वर पोहोचला. त्यानंतर दोन्ही निर्देशांक बंद होताना सपाट झाले. सेन्सेक्स १६४ अंकांनी वाढून ६५,५५८ वर बंद झाला. तर निफ्टी २९ अंकांच्या किरकोळ वाढीसह १९,४१३ वर स्थिरावला.  (Stock Market Closing Bell)

बाजारातील तेजीत रिलायन्स, एचडीएफसी बँक, आयटी आणि रियल्टी स्टॉक्स आघाडीवर राहिले. (Sensex@66000) तर बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक प्रत्येकी ०.५ टक्क्यांनी घसरले. ऑटो, कॅपिटल गुड्स, एफएमसीजी, हेल्थकेअर, ऑइल आणि गॅस आणि पॉवर सेक्टरमध्ये विक्री झाली तर बँक, मेटल, रिअल्टी आणि आयटी क्षेत्रात खरेदी दिसून आली.

काल बुधवारी सेन्सेक्स ६५,३९३ वर बंद झाला होता. तो आज ६५,६६७ वर खुला झाला होता. त्यानंतर त्याने आज ६६,०५२ पर्यंत झेप घेतली. सेन्सेक्सवर टीसीएस, इन्फोसिस, आयसीआयसीआय, बजाज फायनान्स, अॅक्सिस बँक, टेक महिंद्रा, विप्रो, एचडीएफसी बँक, विप्रो, इंडसइंड बँक, बजाज फायनान्स हे शेअर्स वाढले. तर पॉवर ग्रिड, मारुती, एनटीपीसी, नेस्ले इंडिया, रिलायन्स, हिंदुस्तान युनिलिव्हर, टाटा मोटर्स हे शेअर्स घसरले.

Sensex@66000 : तीन वर्षांहून कमी कालावधीत मिळवले १६ हजार अंक

सेन्सेक्सने पहिल्यांदा २४ सप्टेंबर २०२१ रोजी ६० हजारांचा टप्पा पार केला होता. त्यानंतर आतापर्यंत त्याने ६ हजारांहून अधिक अंक मिळवले आहेत. सेन्सेक्सने दोन आठवड्यात ६४ हजार, ६५ आणि आता ६६ हजार असे टप्पे पार केले आहेत. या दोन आठवड्यात तो २ हजारहून अधिक अंकांनी वाढला आहे. सेन्सेक्सचा प्रवास २ जानेवारी १९८६ रोजी ५५० अंकांनी सुरु झाला होता. सेन्सेक्सने ऑक्टोबर १९९९ मध्ये पहिल्यांदा ५ हजारांचा टप्पा पार केला होता. जर गेल्या तीन वर्षाचा विचार केल्यास सेन्सेक्सने जानेवारी २०२१ मध्ये ५० हजारांचा टप्पा ओलांडला होता. आज १३ जुलै २०२३ रोजी त्याने ६६ हजारांचा टप्पा पार केला. तीन वर्षाहून कमी कालावधीत सेन्सेक्सने १६ हजारांहून अधिक अंकांची कमाई केली आहे. (Stock Market Closing Bell)

टीसीएसची बंपर कमाई

आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने पहिल्या तिमाहीत बंपर कमाई केली. या पार्श्वभूमीवर TCS चा शेअर (TCS share price) आज सुमारे ३ टक्के वाढून ३,३५५ रुपयांवर पोहोचला. सेन्सेक्सवरील हा टॉप गेनर शेअर राहिला. टीसीएसच्या तिमाही निकालाचे आकडे आणि अमेरिकेतील महागाई नियंत्रणात आल्याने आयटी शेअर्स वधारले. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस ही भारतातील सर्वात मोठी सॉफ्टवेअर सेवा निर्यातदार आहे. TCS ने एप्रिल ते जून या तिमाहीत ११,०७४ कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. अशाप्रकारे कंपनीच्या निव्वळ नफ्यात १६.८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तसेच कंपनीच्या महसुलात १२.५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

पतंजली फूड्सच्या शेअर्समध्ये ५ टक्के लोअर सर्किट

पतंजली आयुर्वेद लिमिटेडने आजपासून दोन दिवसीय ऑफर फॉर सेल (OFS) सुरु केल्याने BSE वर गुरुवारी झालेल्या व्यवहारात पतंजली फूड्सच्या शेअर्सला (Shares of Patanjali Foods) ५ टक्के लोअर सर्किट लागले. यामुळे हा शेअर १,१६५ रुपयांवर आला. एक्सचेंज फाइलिंगनुसार, कंपनी १३ जुलै आणि १४ जुलै रोजी ऑफर फॉर सेलमध्ये कंपनी ९ टक्के हिस्सेदारी म्हणजेच ३.२६ कोटी शेअर्सची विक्री करेल. १३ जुलै रोजी बिगर किरकोळ गुंतवणूकदार आणि १४ जुलै रोजी किरकोळ गुंतवणूकदारांसाठी ही ऑफर खुली राहणार आहे.

झोमॅटो तेजीत

ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटोच्या शेअर्सने (Shares of Zomato) बीएसईवरील गुरुवारच्या इंट्राडे ट्रेडमध्ये ९ टक्के वाढून ५२ आठवड्यांचा उच्चांक गाठला. हा शेअर आज ८४ रुपयांवर पोहोचला. त्यानंतर तो ८२ रुपयांवर स्थिरावला.

विलीनीकरणानंतर एचडीएफसी बँक शेअर्सची कामगिरी

एचडीएफसी बँकेमध्ये सर्व-स्टॉक रिव्हर्स विलीनीकरणानंतर एचडीएफसीचे ट्रेडिंग आज निलंबित करण्यात आले. या पार्श्वभूमीवर एचडीएफसी बँकेचा शेअर (HDFC Bank Share Price) आज १ टक्क्यांहून अधिक वाढून १,६४४ रुपयांवर पोहोचला.

जागतिक बाजारातील स्थिती काय?

जूनमधील अमेरिकेतील महागाईचा दर अपेक्षेपेक्षा कमी म्हणजे ३ टक्क्यांवर आला. दोन वर्षांतील हा सर्वात कमी महागाई दर आहे. यामुळे गुंतवणूकदारांच्या भावना उंचावल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात तेजी राहिली. अमेरिकेसह आशियाई बाजारात तेजीचे वातावरण होते. देशातील महागाई कमी झाल्याने २६ जुलै रोजी अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह व्याजदरवाढीला विराम देईल असे संकेत मिळत आहे. यामुळे अमेरिकेतील बाजारात तेजी परतली आहे. अमेरिकेतील एस अँड पी ५०० निर्देशांक ०.७ टक्के आणि डाऊ जोन्स इंडस्ट्रियल ॲव्हरेज ०.३ टक्के आणि नॅस्डॅक कंपोझिट १.२ टक्के हे निर्देशांक वाढून बंद झाले. तर आशियाई बाजारातील जपानचा निक्केई १.५ टक्के, हाँगकाँगचा हँगसेंग २.६ टक्के वाढला.

डॉलर- रुपया फॅक्टर

अमेरिकी डॉलर निदेशांक घसरून १००.४१ पर्यंत खाली आला आहे. या निर्देशांकांची एप्रिल २०२२ नंतरची ही निच्चांकी पातळी आहे. आयातदारांकडून डॉलरची मागणी कमी होण्याआधी सुरुवातीच्या व्यवहारात डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया २१ पैशांनी वाढून ८१.९७ वर पोहोचला होता.

परदेशी गुंतवणूकदारांचा ओघ

परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FII) भारतीय शेअर बाजारात आर्थिक वर्ष २०२३ मध्ये आतापर्यंत सुमारे १.२८ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. गेल्या काही दिवसांपासून परदेशी गुंतवणूकदारांचा भारतीय बाजारातील ओघ कायम आहे.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT