सांगली, मिरज शहरासह जिल्ह्यातील संपूर्ण एस.टी. वाहतूक आज (सोमवार) मध्यरात्रीपासून ठप्प झाली. अचानकपणे सर्व वाहतूक ठप्प झाल्याने दिवाळीनिमित्त परगावी गेलेले प्रवासी स्थानकातच अडकून पडले.
विलिनीकरणाच्या मागणीसाठी एस.टी. कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. या संपात आटपाडी आगाराने पुढाकार घेत गेल्या आठ ते दहा दिवसांपासून आगारातील संपूर्ण एस.टी. वाहतूक बंद ठेवली होती. परंतु जिल्ह्यातील इतर वाहतूक मात्र सुरळीत सुरू होती. आटपाडी आगारातील संपाची झळ विटा आगारामध्ये पोहोचल्याने या आगारातील वाहतूक देखील विस्कळीत झाली होती. ऐन दिवाळीत जत आगाराने संपात सहभागी होऊन वाहतूक बंद केली होती. त्यानंतर रविवारी सकाळपासून शिराळा आणि इस्लामपूर या दोन आगारातील वाहतूक ठप्प झाली होती.
परंतु सोमवारी मध्यरात्रीपासून जिल्ह्यातील सांगली, मिरज, तासगाव, विटा, कवठेमंकाळ, पलूस या आगारामधील देखील एस.टी. वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. मध्यरात्रीपासून अचानक एसटी वाहतूक बंद झाल्याने परगावी गेलेले प्रवासी मात्र परगावात अडकून पडले आहेत. सांगली आगारामधून खासगी मालकीच्या दोन शिवशाही मात्र रवाना झाल्या आहेत.
एसटी वाहतूक ठप्प झाल्याने खासगी वाहतूक करणाऱ्यांचे मात्र फावले आहे. मनमानी दराने प्रवाशांकडून पैसे घेऊन खासगी वाहतूक सुरू आहे. ऐन सणासुदीत गैरसोय झाल्याने तसेच खासगी वाहतुकीचा भुर्दंड बसल्याने प्रवाशांमधून मात्र संताप व्यक्त होत होता.