Latest

आझाद मैदानातून एसटी आंदोलकांना पोलिसांनी काढले बाहेर, सीएसटी रेल्वे स्थानकात ठिय्या

backup backup

कुर्ला ; पुढारी वृत्तसेवा : मध्यरात्री आझाद मैदान येथे बसलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना पोलिसांनी बाहेर काढले. दरम्यान या आंदोलकांनी सीएसटी रेल्वे स्थानकात ठिय्या मांडला. आम्हाला पोलिसांनी मध्यरात्री लाठीमार करून बाहेर काढले. आमच्यावर अन्याय करण्यात आला आहे. बाहेरचे पोलीस आम्हाला रेल्वे स्थानकाबाहेर येऊ देत नाहीत आणि रेल्वे स्थानकातूनही पोलीस जा म्हणून सांगत आहेत. यामुळे आता आम्ही काय करणार आम्ही इथेच बसून राहू, असा पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतला.

मागच्या सहा महिन्यांपासून आझाद मैदान येथे आंदोलन करणाऱ्या सुमारे १०० एसटी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी दुपारी अचानक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक बंगल्यावर चपला भिरकावल्या व दगडफेक केली. महिला कर्मचाऱ्यांनी हातावर हात आपटत बांगड्या फोडल्या आणि पवारांच्या निषेधार्थ शिमगा केला.

आझाद मैदान ते पेडर रोड हे कर्मचारी धडकले तरी मुंबई पोलिसांना याबाबत गंधवार्ताही नव्हती पवारांच्या बंगल्यावर झालेल्या या हल्ल्याने मुंबई पोलिसांचे आणि राज्य सरकारच्याही अब्रुचे अक्षरश: धिंडवडे निघाले. आता हे आंदोलन पूर्वनियोजीत होते की उत्स्फुर्त याची चौकशी पोलिस करत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी शेकडोंच्या जमावाने केलेल्या हल्ल्यामुळे पोलिस यंत्रणेचे अपयश उघड झाले आहे. एसटी कर्मचार्‍यांनी गुरुवारी न्यायालयाच्या निकालानंतर बारामतीत जाण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे एसटी कर्मचार्‍यांमध्ये शरद पवार यांच्याविषयी रोष असून ते काहीतरी आगळीक करतील हे स्पष्ट असतानाही पोलिस यंत्रणा आणि त्यांचा गुप्त वार्ता विभाग निद्रिस्त राहिला. पोलिसांचे हे अपयश गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी मान्य केले असून चौकशी करून कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

SCROLL FOR NEXT