शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याने पोलिस यंत्रणेचे अपयश उघड

शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याने पोलिस यंत्रणेचे अपयश उघड

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी शेकडोंच्या जमावाने केलेल्या हल्ल्यामुळे पोलिस यंत्रणेचे अपयश उघड झाले आहे. एसटी कर्मचार्‍यांनी गुरुवारी न्यायालयाच्या निकालानंतर बारामतीत जाण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे एसटी कर्मचार्‍यांमध्ये शरद पवार यांच्याविषयी रोष असून ते काहीतरी आगळीक करतील हे स्पष्ट असतानाही पोलिस यंत्रणा आणि त्यांचा गुप्त वार्ता विभाग निद्रिस्त राहिला. पोलिसांचे हे अपयश गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी मान्य केले असून चौकशी करून कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

एसटी कर्मचार्‍यांची शासकीय सेवेत विलीनीकरण करण्याची मागणी अमान्य करीत मुंबई उच्च न्यायालयाने 22 एप्रिलपर्यंत त्यांना कामावर हजर होण्याचे आदेश दिले. त्यामुळे नोव्हेंबरपासून आझाद मैदानावर आंदोलनाला बसलेल्या एसटी कर्मचार्‍यांच्या पदरी निराशा आली.

गुरुवारी आझाद मैदानात गुणरत्न सदावर्ते यांच्या उपस्थितीत झालेल्या कर्मचार्‍यांच्या सभेत शरद पवार यांच्या बारामतीतील निवासस्थानी जाऊन आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यावेळीच पोलिस यंत्रणेने सतर्क होणे आणि आंदोलक कर्मचार्‍यांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे आवश्यक होते; मात्र पोलिस यंत्रणा मात्र थंड बसली.

शुक्रवारी दुपारी शेकडो आंदोलक शरद पवार यांच्या घरासमोर पोहोचले. त्यामध्ये महिलांचा सहभागही मोठा होता. त्यामुळे हा हल्ला पूर्वनियोजित होता; मात्र त्याचा सुगावा पोलिसांना कसा लागला नाही, याचीही चर्चा सुरू झाली आहे. पोलिस यंत्रणेचे हे अपयश दिलीप वळसे-पाटील यांनी मान्य करीत कारवाईचे संकेत दिले आहेत.

इंटेलिजन्स फेल्युअर शोधून काढू : वळसे-पाटील

शरद पवारांसारख्या मोठ्या आणि महत्त्वाच्या व्यक्तीच्या घरी एवढ्या मोठ्या संख्येने लोक जातात आणि गुप्तचर यंत्रणेला याची माहिती कशी मिळाली नाही, याची चौकशी केली जाईल, असे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी स्पष्ट केले.

ही घटना चुकीची आहे

शरद पवार यांच्या घरावर अशा प्रकारे हल्ला होणे चुकीचे आहे. ही काळजीची गोष्ट आहे. यामध्ये गुप्तचर यंत्रणा कुठे चुकली ते निश्चितच शोधून काढू. याबाबत पोलिस आयुक्तांना सूचना देण्यात आल्या आहेत. जे यामध्ये दोषी असतील, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही वळसे-पाटील म्हणाले.

गनिमी कावा कुणाचा?

संपकरी एस. टी. कर्मचारी गेले सहा महिने आझाद मैदानात कमी-अधिक संख्येने तळ ठोकून आहेत. दोन दिवसांपूर्वी मुंबई महापालिकेसमोर शौचास बसण्याचा प्रकार सोडला तर या कर्मचार्‍यांनी कोणताही उपद्रव मुंबईत निर्माण केला नाही. कोणत्याही मंत्र्याच्या घरावर त्यांनी मोर्चा काढला नाही. गुरुवारी उच्च न्यायालयाचा निकाल विरोधात गेल्यानंतरही आझाद मैदानात कोणताही उद्रेक झाला नाही.

शुक्रवारी मात्र या कर्मचार्‍यांना थेट शरद पवारांच्या घरावर हल्ला चढवण्याचा कानमंत्र कुणी दिला, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. आझाद मैदान ते पेडर रोड हे अंतर पाच किलोमीटरचे आहे. कर्मचार्‍यांचा जमाव रस्त्याने चालत गेला असता तर कुठल्या तरी नाक्यावरील पोलिसांनी त्यास जरूर हटकले असते. तसे झाले नाही.

याचा अर्थ या कर्मचार्‍यांना थेट 'सिल्व्हर ओक'च्या दारात म्हणजे जवळपास थेट सोडण्याची व्यवस्था कुणीतरी केली आणि पोलिसांना गंधवार्ताही लागू न देता हा जमाव गनिमी काव्याने पवारांच्या बंगल्यावर चाल करून जाऊ शकला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news