Latest

Asia Cup 2022 : बांगलादेशला २ विकेट्सनी पराभूत करत श्रीलंकेची सुपर ४ मध्ये एन्ट्री

अमृता चौगुले

दुबई; पुढारी ऑनलाईन : अटीतटीच्या आणि रोमहर्षक सामन्यात आशिया कप २०२२ चा यजमान संघ श्रीलंकेने बांगला देशला २ विकेट्ने पराभूत केले. या विजयासह श्रीलंकेने सुपर ४ मध्ये स्थान पटाकावले आहे. बांगला देशने ठेवलेल्या १८३ धावांच्या आव्हान गाठताना श्रीलंकेची चांगलीच दमछाक झाली. संपूर्ण सामन्यात श्रीलंका व बांगला देशमध्ये चांगलीच चढाओढ पाहण्यास मिळाली. श्रीलंकेचे फलंदाज देखिल ऐनवेळी विकेट टाकत राहिल्यामुळे सामना दरवेळी पलटत जात होता. अखेर तळातील चमिका करुणारत्ने आणि असिथा फर्नांडो या फलंदाजांच्या धैर्यशील खेळीमुळे २ बळी राखत बांगला देशवर विजय नोंदवला. या पराभवाने बांगलादेशचा संघ आशिया चषकातून बाहेर पडणारा पहिला संघ ठरला.

बांगला देशने ठेवलेल्या १८४ धावांचा पाठलाग करण्यास मैदानात उतरलेल्या श्रीलंकेच्या संघाने चांगली सुरुवात केली. पाचव्या षटकात ४५ धावा बोर्डवर लावल्यावर त्यांनी पहिला बळी गमावला. त्यानंतर एक प्रकारे ठराविक अंतरावर श्रीलंका विकेट गमावत गेली. सलामीवीर कुशल मेडिंस याने मात्र एकबाजू लावून धरत धावगती देखिल वाढवली. त्याला एक जीवनदान देखिल मिळाले त्याचा फायदा घेत मेंडिस याने अर्धशतक झळकावले. अखेर १६ व्या षटकात तो बाद झाला. त्याने ३७ चेंडूत ६० धावांची महत्त्वाची खेळी केली.

त्याच्या नंतर देखिल एका बाजूने श्रीलंकेचे फलंदाज आपले विकेट टाकत होते. यानंतर धनुष शनाका याने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. तो अठराव्या षटकात ४५ धावांवर बाद झाला. त्याने ३३ चेंडूचा सामना केला. अखेरच्या षटकात चमिका करुनारत्ने याची फटकेबाजी व १९ व्या षटकात असिथा फर्नांडो सोबत मिळून घेतलेल्या १७ धावा यामुळे श्रीलंका विजया समीप पोहचला. पण, सामन्यातील उत्कंठा अजून बाकी होती.

१९ व्या षटकातील ५ व्या चेंडूवर चमिका हा १६ धावांवर धाव बाद झाला. त्याने १० चेंडूचा सामना केला. पुन्हा १९ व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर फर्नांडो याने चौकार ठोकला. यामुळे श्रीलंकेला जिंकण्यासाठी आता शेवटच्या षटकात आठ धावांची आवश्यकता होती. अखेरच्या षटकात फिरकी गोलंदाज मेहंदी हसन हा गोलंदाजीसाठी आला. कारण बांगला देशने आधीच आपले सर्व जलदगती गोलंदाजांचे ओव्हर संपवले होते. भारत विरुद्ध पाकिस्तान दरम्यान जी स्थिती पाकिस्तानची झाली होती तशीच अवस्था बांगला देशची सुद्धा झाली होती. शिवाय निर्धारीत वेळेत षटके न टाकल्यामुळे त्याचा त्यांना फटका बसला व यामुळे अखेरच्या षटकांमध्ये त्यांना पाच क्षेत्ररक्षक ३० यार्डमध्ये ठेवणे भाग पडले.

याचाच फायदा श्रीलंकेचा तळातला फलंदाज फर्नांडो याने घेतला. शेवटच्या षटकातील पहिल्या चेंडूवर महिश तिक्शना याने फर्नांडोला एक धाव काढून स्ट्राईक दिली. फर्नांडो हा स्ट्राईकवर येताच दुसऱ्या चेंडूवर त्याने मेहंदी हसनला चौकार ठोकला. आता चार चेंडूत तीन धावांची आवश्यकता होती. मेहंदीने तिसरा चेंडू टाकला त्यावर फर्नांडो याने २ धावा घेत सामना टाय केला. पण, मेहंदीने टाकलेला तो चेंडूत नो बॉल ठरला व श्रीलंकेने हा सामना २ विकेट्स राखून जिंकला.

SCROLL FOR NEXT