पुढारी ऑनलाईन डेस्क : फिरकीपटू प्रभात जयसूर्या आणि रमेश मेंडिस यांनी पाकिस्तानच्या फलंदाजीला सुरुंग लावत श्रीलंकेला गाले कसोटीत 246 धावांची शानदार विजय मिळवून दिला. दुसऱ्या डावात दोघांनी मिळून पाकिस्तानच्या 9 फलंदाजांची शिकार केली. यासह ही मालिका 1-1 अशी बरोबरीत सुटली. श्रीलंकेने दिलेल्या 508 धावांच्या विशाल लक्ष्यासमोर बाबर आझमचा संघ 261 धावांत गारद झाला. (SL vs PAK Test)
एका विकेटच्या मोबदल्यात 89 धावांनी पाचव्या दिवसाची सुरुवात करणाऱ्या पाकिस्तानचा दुसरा डाव 261 धावांवर आटोपला. जयसूर्याने दुस-या डावात 117 धावांत पाच विकेट्स घेतल्या आणि चौथ्या पाच बळींचा टप्पा पूर्ण केला. त्याचवेळी पहिल्या डावात पाच बळी घेणाऱ्या मेंडिसने दुसऱ्या डावात चार विकेट घेत 101 धावा दिल्या.
तत्पूर्वी, आज सामन्याच्या शेवटच्या पाचव्या सामन्यात पाकिस्तानने कालच्या 1 बाद 89 धावांपुढे खेळण्यास सुरुवात केली. पाकने सर्वात पहिल्यांदा इमाम उल हकची विकेट गमावली. तो 49 धावा करून रमेश मेंडिसच्या गोलंदाजीवर बाद झाला. यानंतर बाबर आझमने मोहम्मद रिझवानच्या साथीने संयमी खेळीचे प्रदर्शन केले. या जोडीने तिस-या विकेटसाठी 79 धावांची भागिदारी केली. रिझवान 37 धावा करून माघारी परतला. त्याला प्रभात जयसूर्याने बाद करून श्रीलंकेला तिसरे यश मिळवून दिले. यानंतर पाकच्या दोन विकेट झटपट पडल्या. फवाद आलम केवळ 1 धाव काढून धावबाद झाला, तर आघा सलमानही (4 धावा) माघारी परतला. 188 च्या धावसंख्येवर पाकचा निम्मा संघ तंबूत परतला होता.
एका बाजूला कर्णधार बाबर आझम टिकून होता. पाक संघाच्या सर्व आशा त्याच्यावर होत्या. पण जयसूर्याने श्रीलंकेसाठी सहावे यश मिळवून देत 81 धावांच्या वैयक्तिक स्कोअरवर बाबरला पायचित पकडले. पाकिस्तानला हा मोठा धक्का होता. यानंतर यासिर शाहने 25 चेंडूत 27 धावा केल्या, पण लक्ष्य इतके मोठे होते की त्याच्या दबावाखाली पाकिस्तानचा दुसरा डाव गडगडला. इतर कोणत्याही फलंदाजाला खेळपट्टीवर स्थिरावता आले नाही. त्यांचा संपूर्ण संघ 77 षटकांत 261 धावा करून बाद झाला. श्रीलंकेकडून प्रभात जयसूर्याने पाच आणि रमेश मेंडिसने चार बळी घेतले.
तत्पूर्वी, श्रीलंकेने पहिल्या डावात 378 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानने पहिल्या डावात 231 धावा केल्या. त्यानंतर श्रीलंकेने दुसऱ्या डावात 8 विकेट्सच्या मोबदल्यात 360 धावा केल्या आणि पहिल्या डावातील आघाडीच्या आधारे पाकिस्तान समोर 508 धावांचे लक्ष्य ठेवले. हे विजयी लक्ष्य गाठताना पाकिस्तानच्या फलंदाजांनी हाराकीरी केली आणि सामन्याच्या शेवटच्या पाचव्या दिवशी दारुण पराभव पत्करावा लागला.
प्रभात जयसुर्याने या महिन्यात 8 जुलै रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध गॉल कसोटीत पदार्पण केले होते. त्यानंतर प्रभातने तीन कसोटी सामन्यांच्या 6 डावात 29 बळी घेतले आहेत. अशाप्रकारे, पदार्पणानंतर पहिल्या तीन कसोटीत सर्वाधिक बळी घेणारा तो दुसरा (संयुक्त) गोलंदाज ठरला आहे. त्याने ऑस्ट्रेलियाचा माजी गोलंदाज चार्ली टर्नरशी बरोबरी केली आहे. यामध्ये भारताचा माजी फिरकी गोलंदाज नरेंद्र हिरवानी अव्वल आहे. त्याने 31 विकेट घेतल्या होत्या.
नरेंद्र हिरवाणी – 31 विकेट्स
प्रभात जयसूर्या – 29 विकेट्स
चार्ली टर्नर – 29 विकेट्स
अक्षर पटेल – 27 बळी
रॉडनी हॉग – 27 विकेट्स
पाकिस्तानविरुद्धच्या विजयामुळे श्रीलंकेचा संघ आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. संघाची विजयाची टक्केवारी 53.33 असून त्यानंतर टीम इंडिया चौथ्या क्रमांकावर तर पाकिस्तान पाचव्या क्रमांकावर आहे. तर दक्षिण आफ्रिका पहिल्या क्रमांकावर आणि ऑस्ट्रेलिया दुसऱ्या क्रमांकावर आहे.