Latest

दिल्लीवर धुक्याची चादर, ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच प्रदूषण पातळीत वाढ

अमृता चौगुले

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : दिल्लीतून मान्सून परतत नाही तोच प्रदुषण पातळीत वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून प्रदूषण वाढू लागल्याने नागरिक हैराण झाले आहेत. प्रदूषणामुळे बुधवारी दिल्ली धुक्याच्या चादरीखाली होती.

हवेतील प्रदूषण वाढल्याने अनेक लोकांना डोळ्यात जळजळण्याचा त्रास झाला. दिल्ली व त्याला लागून असलेल्या गाझियाबाद, गुरुग्राम या शहरांमध्ये एअर क्वालिटी इंडेक्स अर्थात एक्यूआय 200 च्या वर गेला आहे. पंजाब, हरियाणाा तसेच उत्तर प्रदेशात कृषी पिकांचे अवशेष जाळण्यास सुरुवात झाल्यानंतर प्रदूषण वाढण्यास सुरुवात होते. खरीप हंगामातील पिके काढल्यानंतर वरील राज्यांतील शेतकऱ्यांनी पिकांचे अवशेष जाळण्यास सुरुवात केल्याने दिल्ली एनसीआरमधील प्रदूषण वाढल्याचे पर्यावरण क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

दाट धुरामुळे दिल्ली एनसीआरमधील दृष्यता काही प्रमाणाात कमी झाली आहे. दिल्ली शहरातील आनंद विहार, धौला कुंवा, आश्रम, लाजपत नगर, पीरागढी, मधुबन चौक, वजिराबाद तसेच बदरपूर बॉर्डर या भागातला एआयक्यू दोनशेच्याही पुढे गेला आहे.

प्रदुषणाला आळा घालण्यासाठी सरकारकडून काही नियम बनविण्यात आले आहेत. त्यानुसार एआयक्यू तीनशेच्या पुढे गेल्यानंतर डिझेल जनरेटर चालविण्यास बंदी घातली जाते. गतवर्षीच्या नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात प्रदुषणचा नवा विक्रम झाला होता. डिसेंबरमध्ये तर सलग सहा दिवस लोकांना विषारी वायूचा सामना करावा लागला होता.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT