Latest

ज्योतिष्याकडून मुहुर्त काढत बारामतीत दरोडा टाकणारे अखेर जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेचे यश

अमृता चौगुले
बारामती, पुढारी वृत्तसेवा: बारामती तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत देवकातेनगर येथे महिलेचा हात-पाय बांधत आणि तिला मारहाण करत १ कोटी ७ लाखांचा दरोडा टाकणाऱ्या दरोडेखोरांना पकडण्यात अखेर पोलिसांना यश आले. पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने ही कामगिरी केली. या प्रकरणी सहाजणांना अटक करण्यात आली आहे.
सचिन अशोक जगधणे (वय ३०, रा. गुणवडी, २९ फाटा, ता. बारामती), रायबा तानाजी चव्हाण (वय ३२, रा. शेटफळ हवेली, ता. इंदापूर), रविंद्र शिवाजी भोसले (वय २७, रा. निरावागज, बारामती), दुर्योधन उर्फ दिपक उर्फ पप्पू धनाजी जाधव (वय ३५, रा. जिंती हायस्कूलजवळ, ता. फलटण, जि. सातारा), नितीन अर्जून मोरे (वय ३६, रा. धर्मपुरी, ता. माळशिरस, जि. सोलापूर) याच्यासह रामचंद्र वामन चव्हाण (वय ४३, मूळ रा. आंदरुड, ता. फलटण, जि. सातारा, सध्या रा. वडूज, ता.खटाव, जि. सातारा) अशी या दरोड्यातील आरोपींची नावे आहेत.
देवकातेनगर येथे सागर शिवाजी गोफणे व त्यांची पत्नी तृप्ती हे दोन मुलांसह राहतात.  २१ एप्रिल रोजी सागर हे तिरुपती बालाजीच्या दर्शनाला गेले होते. पत्नी व मुले घरी होती. यावेळी रात्री आठ वाजता चोरट्यांनी त्यांच्या घराच्या कंपाऊंडवरून प्रवेश करत तृप्ती यांना मारहाण केली. त्यांचे हात-पाय बांधले. तोंडात कापडाचा बोळा कोंबून घरात प्रवेश केला होता. ९५ लाख ३० हजाराची रोख रक्कम, ११ लाख ५९ हजार रुपयांचे २० तोळे दागिने, ३५ हजार रुपयांचा मोबाईल असा १ कोटी ७ लाख रुपयांचा ऐवज जबरीने चोरून नेला होता. याबाबत अज्ञातांविरोधात तालुका पोलिस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेमुळे बारामती शहरात खळबळ उडाली होती.
विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी हे स्वतः या तपासाबाबत आग्रही होते. त्यानुसार पोलिस अधिक्षक अंकित गोयल यांनी स्थानिक गुन्हे शाखेची पथके नेमली होती. तांत्रिक विश्लेषण व गोपनीय खबरीच्या आधारे अखेर दरोडेखोरांना जेरबंद करण्यात आले. विशेष म्हणजे आरोपींनी आपण पकडले जाऊ नये, याची पुरेपुर खबरदारी घेतली होती. कोणताही मागमूस मागे ठेवला नव्हता. या गुन्ह्यातील आरोपी एमआयडीसीतील मजूर असल्याची माहिती मिळाल्यानंतर संशयितांवर बारकाईने नजर ठेवण्यात आली. वेगवेगळ्या ठिकाणाहून त्यांना ताब्यात घेण्यात आले. या घटनेत अद्यापपर्यंत पोलिसांनी ७६ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. त्यात ६० लाख ९७ हजाराची रोख रक्कम असून १५ लाख ३५ हजार रुपये किमतीचे २६ तोळ्याचे दागिने हस्तगत करण्यातआले आहेत.
ही कामगिरी गोयल, अप्पर पोलिस अधिक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सपोनि नेताजी गंधारे, राहूल गावडे, उपनिरीक्षक अभिजित सावंत, प्रदीप चौधरी, शिवाजी ननवरे, अमित सिदपाटील, गणेश जगताळे, रविराज कोकरे, बाळासाहेब कारंडे, सचिन घाडगे, ज्ञानेश्वर क्षीरसागर, अजित भुजबळ, अभिजित एकशिंगे, स्वप्निल अहिवळे, राजू मोमीन, अतुल डेरे, चंद्रकांत जाधव, मंगेश थिगळे, तुषार पंदारे, जनार्दन शेळके, योगेश नागरगोजे, दिपक साबळे, विक्रम तापकीर, विजय कांचन, अजय घुले, नीलेश शिंदे, अमोल शेडगे, बाळासाहेब खडके, संदीप वारे, धीरज जाधव, अक्षय नवले, मंगेश भगत, मुकुंद कदम, प्रमोद नवले, दगडू वीरकर, अक्षय सुपे यांनी केली.

मुहुर्त पाहून टाकला दरोडा

गोफणे हे जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करत असल्याने त्यांच्याकडे भरपूर पैसा असल्याची माहिती सचिन जगधने याला मिळाली होती. त्याने गुन्ह्याचा कट रचला. रामचंद्र चव्हाण हा ज्योतिषी आहे. त्याच्याकडून मुहुर्त काढून घेत हा दरोडा टाकण्यात आला.
हेही वाचा:
SCROLL FOR NEXT