Latest

सिंहगड घाटात पुन्हा कोसळली दरड; पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

अमृता चौगुले

खडकवासला(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पावसामुळे सिंहगड किल्ल्याच्या घाट रस्त्यावर सोमवारी पहाटेच्या सुमारास दरड कोसळली. तसेच पाच, सहा ठिकाणी धोकादायक दरडींचे दगडगोटे उन्मळून रस्त्यावर आले आहेत. पहाटेच्या सुमारास ही घटना घडल्याने सुदैवाने दुर्घटना टळली. पुणे दरवाजा पायी मार्गावरही दरडी कोसळण्याचा धोका वाढला आहे. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वन विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वादांमुळे घाट रस्त्यावरील दरडी संरक्षित करण्याचे काम गेल्या वर्षीपासून रखडले आहे. रविवारी (दि. 2) सिंहगडावर वीस हजारांहून अधिक पर्यटकांनी गर्दी केली होती.

सकाळपासून रात्री आठपर्यंत घाट रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यावेळी दरडी कोसळण्याची घटना घडली असती, तर मोठी दुर्घटना घडली असती. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी दरडी कोसळण्याचा धोका असलेल्या ठिकाणी घाट रस्त्यावर तसेच गडाच्या पायी मार्गावर वनविभागाने सुरक्षा रक्षक तैनात केले आहे. सिंहगड वनविभागाच्या कर्मचार्‍यांनी घाट रस्त्यावर कोसळेल्या दरडीचा रोडारोडा काढण्याचे काम सकाळपासून सुरू करून दुपारपर्यंत हा रस्ता मोकळा केला. दरम्यान, घाट रस्त्याप्रमाणे वाहनतळावरून गडावर जाणार्‍या पुणे दरवाजा पायी मार्गावरही दरड कोसळण्याचा धोका वाढला आहे.

वनरक्षक बाळासाहेब जिवडे म्हणाले, सिंहगड परिसरात रविवारी मध्यरात्रीपासून पावसाची रिमझिम वाढली. त्या वेळी घाट रस्त्यावर पाच ठिकाणी दगड-गोटे तसेच एका ठिकाणी दरड कोसळली आहे. सोमवारी सकाळपासून राडारोडा काढण्याचे काम सुरू करण्यात आले आणि दुपारपर्यंत रस्ता मोकळा करण्यात आला.

आमदार तापकीर म्हणाले की, घाट रस्त्यावरील दरडी संरक्षित करण्यासाठी वन विभागाने बांधकाम विभागाला निधी दिला आहे. मात्र, प्रत्यक्षात हे काम झाले नाही. येत्या दोन दिवसांत दोन्ही अधिकार्‍यांसह घाट रस्त्याची पाहणी केली जाणार आहे. त्यानंतर काम पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकार्‍यांना देण्यात येतील.

पुणे दरवाजाचा भाग पुरातत्त्व विभागाकडे आहे. ढिसूळ झालेले बुरूज, कड्याच्या दगडी पायी मार्गावर कोसळत आहेत. पुरातत्त्व विभागाने याकडे लक्ष द्यावे. घाट रस्त्यावर एका ठिकाणी दरडीचा प्रश्न आहे. मात्र, इतर ठिकाणच्या दरडीचे काम करण्यास बांधकाम विभागाला अडचण नाही.

– संजय संकपाळ, वनपरिक्षेत्र अधिकारी, पुणे वनविभाग.

तांत्रिक अडचणींमुळे दरडी संरक्षित करण्याचे काम सुरू झाले नाही. याबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय घेतला जाईल.

– आर. एम. रणसिंग, उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग.

पुणे दरवाजा मार्गाची लवकरच पाहणी केली जाणार आहे. धोकादायक ठिकाणी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील.

– डॉ. विलास वाहणे, सहसंचालक, पुरातत्त्व विभाग.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT