Latest

बॉम्बस्फोट, गोळीबार आणि उद्ध्वस्त इमारती, युक्रेनमधून परतलेल्या सांगलीच्या श्रद्धा शेटे हिने उलगडला थरारक प्रवास

अनुराधा कोरवी

कासेगाव : पुढारी वृत्तसेवा :'आजूबाजूला पडणारे बॉम्ब, बॉम्बस्फोटात उद्ध्वस्त झालेल्या इमारती, जीवाच्या आकांताने सैरावैरा पळत सुटलेले हजारो नागरिक, कधी एखादा बॉम्ब येऊन आपल्यावर पडेल याची भीती. ना खायला अन्‍न, ना पाणी, ना राहायला निवारा… या सगळ्यातून कसाबसा जीव वाचवून मायदेशात परत आले. पण बहीण मागे राहिल्याने काळजी लागून राहिली आहे…' असा थरारक अनुभव युक्रेनमधून सुखरूप परतलेल्या श्रद्धा शेटे हिने दै. 'पुढारी'शी बोलताना व्यक्‍त केला.

वाटेगाव (ता. वाळवा) येथील श्रद्धा शेटे आणि साक्षी शेटे या सख्ख्या बहिणी वैद्यकीय शिक्षणासाठी युक्रेनमध्ये होत्या. युद्धाचा भडका उडाल्यानंतर जीवाच्या भीतीने त्यांनी मायदेशाकडे धाव तर घेतली. पण, हा परतीचा प्रवास फारच जीवघेणा होता.\

आपला अनुभव सांगताना श्रद्धा म्हणाली, आम्ही दोघी बहिणी बुको युनियन स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी चरणीवत्सी येथील होस्टेलमध्ये राहतो. युद्ध सुरू झाल्यावर आम्ही सर्व भारतीय विद्यार्थी एका बसमधून 650 किलोमीटर दूर असलेल्या कीव्हच्या दिशेने निघालो. रोमानियाच्या सीमेवर बॉम्बवर्षाव आणि फायरिंग सुरू होतेे. कीव्ह विमानतळावर पोहोचलो तर सर्व विमानसेवा बंद केल्याचे समजले. युक्रेनियन प्रशासनाने आम्हाला पुन्हा होस्टेलला जाण्यास सांगितले.

कसाबसा प्रवास करीत आम्ही होस्टेलला गेलो असता सर्व शिक्षक, होस्टेलचे कर्मचारी, आचारी यांनी भीतीपोटी पलायन केले होते. आता काही धडगत नाही, असे आम्हाला वाटू लागले.तेवढ्यात भारतीय दूतावासातील लोकांनी आमच्याशी संपर्क साधून आमच्या वेगवेगळ्या तुकड्या केल्या. नंतर आम्हाला युक्रेन-रोमानियाच्या बॉर्डरवर आणण्यात आले. पण बहीण साक्षी वेगळ्या तुकडीमध्ये विभागली गेल्याने तिथेच ताटातूट झाली. मी पहिल्या तुकडीत असल्याने पुढे रोमानियाच्या बॉर्डरवर आले. भारतीय दूतावासातील अधिकारी आम्हाला सुखरूप रोमानियात घेऊन गेले. रोमानियाच्या ओपिटल एअरपोर्टवरून आम्हाला शनिवारी (दि. 26) रात्री 9 वाजता दिल्लीला रवाना केले.

हेही वाचलंत का? 

सगळे उद्ध्वस्त झालेले असल्यामुळे खायला काही मिळत नव्हते. चिप्स व पाणी पिऊन आणि जीव मुठीत घेऊन प्रवास सुरू होता. कीव्हच्या जवळ चार-पाच किलोमीटर अंतरावर पोहोचलो तर संपूर्ण शहरात रशियन फौजा घुसलेल्या दिसल्या. बॉम्बस्फोट होत होते. बंदुकीच्या गोळ्यांचा जणू वर्षावच सुरू होता. डोळ्यादेखत 10-15 चारचाकी जळून खाक झाल्या. समोर 30 ते 40 लोक मृत्युमुखी पडल्याचे प्रत्यक्ष पाहिले.
– श्रद्धा शेटे

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT