Latest

‘आम्ही देखील पाहून घेऊ’, अनिल परबांच्या घरांवरील ईडी छापेमारीवर संजय राऊतांचा इशारा

दीपक दि. भांदिगरे

मुंबई; पुढारी ऑनलाईन

मनी लाँड्रिंग प्रकरणी परिवहन मंत्री अनिल परब यांचे निवासस्थान तसेच त्यांच्याशी संबंधित एकूण सात ठिकाणांवर आज गुरुवारी ईडीने छापेमारी केली. या कारवाईवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'आम्ही देखील पाहून घेऊ', असा इशारा राऊतांनी दिला आहे.

अनिल परब कडवट शिवसैनिक आहेत. त्यांच्यावर सूडबुद्धीने कारवाई सुरु असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ज्याप्रकारे ईडीकडून आरोप लावले जात आहेत; त्याहून अधिक गंभीर प्रकारचे गुन्हे भाजपच्या लोकांवर आहेत. पण त्यांना कुणी हात लावत नाही. आम्ही अनिल परब यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत, असे राऊत यांनी म्हटले आहे.

केवळ शिवसेनेला त्रास आणि अडचणीत आणण्यासाठी कारवाया करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मी ईडीकडे अनेक प्रकरणे पाठवली. पण ती फाईल उघडण्याची तसदीही कुणी घेतली नसल्याचे त्यांनी नमूद केले आहे. महाराष्ट्रातील राजकारणाला इतकं वाईट वळणं कधीच लागलं नव्हतं, अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, अनिल परबांवरील कारवाईवर भाजप नेते किरीट सोमय्यांनी भाष्य केले आहे. अनिल परबांनी आता कपड्यांची बॅग तयार ठेवावी. अनिल देशमुख, नवाब मलिक तुरुंगात आहेत, आता अनिल परबांनी तयार राहावे, असे सोमय्यांनी ट्विट केलेल्या व्हिडिओत म्हटले आहे.

शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब आता ईडीच्या रडारवर आले आहेत. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी परब यांच्या शासकीय तसेच खासगी निवासस्थानी ईडीने छापेमारी सुरु केली आहे. अनिल परब यांच्याशी संबंधित मुंबई आणि पुणे येथील एकूण सात ठिकाणी ईडीची छापेमारी सुरु आहे. ईडीची एक टीम गुरुवारी सकाळी साडेसहा वाजता अनिल परब यांच्या अजिंक्यतारा या निवासस्थानी पोहोचली. पोलिस बदल्यांच्या प्रकरणात सचिन वाझेंच्या जबाबात अनिल परब यांचे नाव समोर आले आहे. यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात येत असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT