Latest

शिवकुमार मुख्यमंत्री, सतीश जारकीहोळी उपमुख्यमंत्री?

मोहन कारंडे

बंगळूर : पुढारी वृत्तसेवा : कर्नाटक विधानसभेत स्पष्ट बहुमत मिळवून निवडून आलेल्या काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी जोरदार रस्सीखेच सुरू झाली असून, 39 लिंगायत आमदारांची पसंतीच पुढचा मुख्यमंत्री ठरवेल, अशी शक्यता आहे. त्यानुसार अधिकाधिक आमदारांनी डी. के. शिवकुमारांना पसंती दर्शवल्याचे समजते. तर उपमुख्यमंत्री सतीश जारकीहोळी यांची निवड होऊ शकते. मात्र काही लिंगायत तसेच दलित आमदारांनी सिद्धरामय्यांना मुख्यमंत्री बनवण्याची मागणी केली आहे. हा पेच सोडवण्यासाठी रविवारी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावण्यात आली होती. मात्र आमदारांत एकमत न झाल्याने गटनेता निवडण्याची जबाबदारी पक्षश्रेष्ठींकडे सोपवण्याचा ठराव विधिमंडळ बैठकीत झाला.

रविवारी रात्री काँग्रेसच्या 135 आमदारांची बैठक येथील खासगी हॉटेलमध्ये झाली. बैठकीपूर्वी हॉटेलच्या बाहेर शिवकुमार आणि सिद्धरामय्या दोघांचेही सुमारे पाच हजार समर्थक जमले होते. आपल्याच नेत्याला मुख्यमंत्री बनवण्याची घोषणा ते देत होते. दोन्ही नेत्यांनी समर्थकांना शांततेचे आवाहन करून विधिमंडळ बैठकीत निर्णय होईल असे सांगितले.

बंगळूर येथील एका खासगी हॉटेलमध्ये काँग्रेसचे निरीक्षक सुशिलकुमार शिंदे, पक्षाचे सरचिटणीस जितेंदर सिंग, माजी सरचिटणीस दीपक बाबरिया यांच्या नेतृत्वाखाली रात्री राज्यातील सर्व आमदारांची बैठक झाली. बैठकीत सर्व आमदारांशी चर्चा करुन त्यांची मते घेऊन विधिमंडळाचा गटनेता निवडून मुख्यमंत्री निवडला जाणार होता. पण या बैठकीत सर्व आमदारांनी सर्वानुमते मुख्यमंत्रीपदाचा निर्णय हायकमांडने घ्यावा, असा ठराव करत सर्वाधिकार पक्षाध्यक्षांकडे सोपवण्याचा एका ओळीचा ठराव केला. त्यानुसार शिवकुमार आणि सिद्धरामय्या या दोघांनीही राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी दिल्लीला पाचारण केले आहे. आता दिल्लीतील नेत्यांच्या निर्णयाकडे सवार्र्ंंचे लक्ष लागले आहे.

खात्रीलायक सूत्रांनुसार मुख्यमंत्रीपदासाठी शिवकुमार तर उपमुख्यमंत्रीपदासाठी सतीश जारकीहोळींची निवड निश्चित मानली जात आहे. काँग्रेस पक्षश्रेष्ठींमध्ये काँग्रेस नेते सोनिया गांधी, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचा पाठिंबा शिवकुमार यांना आहे. कारण त्यांच्या नेतृत्वाखाली राज्यात 135 जागा मिळवून स्पष्ट बहुमत खेचून आणण्यात काँग्रेसला यश आले आहे.

दुसरीकडे काँगे्रस नेते राहुल गांधींचा मुख्यमंत्रीपदासाठी सिध्दरामय्या यांना पाठिंबा आहे. कारण सिध्दरामय्या हे राज्यात पक्षाचे वरिष्ठ नेते असून त्याचा फायदा लोकसभा निवडणुकीला होईल, असे त्यांना वाटते. सध्या सिध्दरामय्यांना मुख्यमंत्री करुन, लोकसभा निवडणुकीनंतर शिवकुमार यांना मुख्यमंत्रीपद देण्याचा विचार राहुल यांचा आहे.

तथापि, काँग्रेसच्या एकूण 135 आमदारांपैकी 39 आमदार लिंगायत समुदायाचे आहेत. त्यामुळे त्यांची पसंती महत्त्वाची ठरणार आहे. एम. बी. पाटील हे काँग्रेसमधील ज्येष्ठ व सक्रिय लिंगायत नेते आहेत. ते मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत डार्क हॉर्स मानले जातात. मात्र खरी चुरस शिवकुमार-सिद्धरामय्या अशीच असल्यामुळे लिंगायत आमदार शिवकुमारांच्या बाजूने असल्याचे समजते.

उपमुख्यमंत्रीपद जारकीहोळींना मिळण्याची शक्यता

राज्यात मोठ्या प्रमाणात वाल्मिकी समाज असून, या समाजाची मते खेचण्यात काँग्रेसचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळींना यश आले आहे. त्यांनी राज्यात वाल्मिकी समाज आणि इतर अनुसूचित जमातींचे संघटन करुन काँग्रेस पक्षाला पाठिंबा मिळवून दिले आहेत. तसेच बेळगांव जिल्ह्यात देखील काँग्रेस पक्षाला अभूतपूर्व यश मिळण्यास योगदान असल्याचे पक्ष मानतो. बंगळूर येथे वाल्मिकी समाजाच्या नेत्यांनी बैठक घेऊन सतीश जारकीहोळींना काँग्रेस पक्षाने चांगले पद देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्रीपदी सतीश जारकीहोळींच्या नांवाला शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

कोण होणार विरोधी पक्ष नेता?

राज्यात काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले असून सरकार स्थापनेच्या घडामोडींना वेग आला आहे. तर दुसरीकडे 66 जागा मिळविलेल्या भाजपात विरोधी पक्ष नेतेपदासाठी स्पर्धा सुरू झाली आहे. विरोधी पक्ष नेतेपदासाठी माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचे नाव आघाडीवर आहे. ते एक उत्तम संसदपटू असून सभागृहातला त्यांना चांगला अनुभव आहे. तसेच फायरब्रँड नेता म्हणून ओळखले जाणारे बसनगौडा पाटील-यत्नाळ व माजी मंत्री सुनील कुमार यांचे नाव चर्चेत आहे.

प्रत्येक आमदाराशी स्वतंत्र चर्चा

शिवकुमार आणि सिद्धरामय्यांना काँग्रेस श्रेष्ठींना दिल्लीला सोमवारी पाचारण केले आहे. त्यानुसार सोमवारी सकाळी विमानाने हे दोन्ही नेते दिल्लीला जाणार आहेत. तत्पूर्वी पक्षनिरीक्षक सुशीलकुमार शिंदे, जितेंदर सिंग आणि दीपक बाबरिया यांनी काँग्रेसच्या प्रत्येक आमदाराशी स्वतंत्रपणे चर्चा करून त्याचे वैयक्तिक मत नोंदवून घ्यावे आणि हा अहवाल मध्यरात्रीपर्यंत दिल्लीला पाठवावा, अशी सूचना पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी दिली आहे. त्यानुसार शिंदे, सिंग आणि बाबरीया यांनी विधिमंडळ पक्षाची बैठक झालेल्या हॉटेलमध्येच प्रत्येक आमदाराशी चर्चा सुरू केली. 135 आमदारांशी वैयक्तिक चर्चा करून, त्याचे नाव आणि त्याची पसंती कुणाला अशी यादी बनवण्याचे काम सुरू झाले आहे. ही यादी फॅक्सद्वारे खर्गेंना पाठवण्यात येणार आहे. त्या यादीच्या आधारे सोमवारी दुपारपर्यंत कर्नाटकाचा मुख्यमंत्री ठरवला जाईल, असे संकेत आहेत.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT