मंचर : पुढारी वृत्तसेवा : शिरूर लोकसभा मतदार संघाचे शिवसेनेचे माजी खासदार, उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पक्ष विरोधी भूमिका घेतल्यामुळे शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षातून काढून टाकले आहे.
लांडेवाडी(ता.आंबेगाव जि.पुणे) येथील निवासस्थानी शिवाजीराव आढळराव पाटील आज दुपारी एक वाजता पत्रकार परिषद घेणार आहे त्यामध्ये ते कोणती भूमिका मांडतात याबाबत सर्वांना उत्सुकता आहे.
शिवाजीराव आढळराव पाटील यांनी महाविकास आघाडी बद्दल वारंवार नाराजी उघडपणे व्यक्त केली होती. पक्षप्रमुख आपल्याकडे लक्ष देत नाही आपले ऐकत नाही असे ते काही दिवसापूर्वीच एका कार्यक्रमात बोलले होते. त्यातूनच ही कारवाई झाली असल्याचे बोलले जात असून शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धी पत्र काढून ही माहिती देण्यात आली आहे.
शिवाजीराव आढळराव पाटील हे शिवसेनेचे तीन वेळा निवडून आलेले खासदार होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हात शिवसेनेचे मोठा जाळे तयार झाले असून त्यांना पक्षातून काढून टाकले गेल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून त्यांच्या कार्यकर्त्यांना हा मोठा धक्का आहे त्यांच्यावर झालेल्या कारवाईमुळे पुणे जिल्ह्यात शिवसेनेला मोठे नुकसान होणार आहे.
शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यावर राज्यात बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्या. अखेर एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर विविध स्तरातून एकनाथ शिंदे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाल्याचं पाहायला मिळालं. अशातच शिवसेनेचे उपनेते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी देखील सोशल मीडियावर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना शुभेच्छा दिल्या. यामध्ये त्यांनी 'गर्जत राहील आवाज हिंदुत्वाचा अभिनंदन मुख्यमंत्री साहेब' असं म्हटलं आहे. तसेच या पोस्टमध्ये आढळराव पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा कुठेही फोटो टाकला नसल्याचे दिसत होते.
आढळराव पाटील व त्यांचे कार्यकर्त पुढे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.