देशातील मोठा तरंगता सौरऊर्जा प्रकल्प पूर्ण | पुढारी

देशातील मोठा तरंगता सौरऊर्जा प्रकल्प पूर्ण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था तेलंगणा देशातील सर्वात मोठ्या तरंगता (फ्लोटिंग) सौरऊर्जा प्रकल्पाचे काम पूर्ण झाले आहे. याबाबतची माहिती नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनने (एनटीपीसी) दिली आहे. या प्रकल्पातून तेलंगणातील रामागुंडम शहराला 100 मेगावॅट वीज मिळणार आहे. या प्रकल्पाच्या निर्मितीसाठी 423 कोटी रुपयांचा खर्च आहे. हा प्रकल्प रामागुंडममधील सरोवरामध्ये 500 एकरमध्ये पसरला आहे. हा प्रकल्प 40 भागांमध्ये (ब्लॉक) विभागला आहे. प्रत्येक विभागातून 2.6 मेगावॅट विजेची निर्मिती केली जाईल.

हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर विजेची व्यावसायिक मागणी वाढून 217 मेगावॅट झाली आहे. या सौर ऊर्जा प्रकल्पामुळे दरवर्षी 32.5 लाख क्युबिक पाण्याची बचत होणार असून सौर मॉडेलचे तापमानही संतुलित राखण्यास मदत होणार आहे. तसेच दरवर्षी 1 लाख 65 हजार कोळसाही वाचविला जाणार आहे. दरम्यान यापूर्वी एनटीपीसी केरळमधील कायमकुलममध्ये 92 मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प सुरू केला आहे. हा प्रकल्प सुमारे 350 एकरमध्ये आहे. तर आंध्रप्रदेशातील सिम्हाद्रीमध्ये 25 मेगावॅट क्षमतेच्या तरंगत्या ऊर्जाप्रकल्पाची घोषणा केली होती.

प्रकल्प देशासाठी महत्त्वाचा टप्पा

तेलंगणातील तरंगता सौरऊर्जा प्रकल्प देशातील पहिला आणि मोठा प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे देशातील विजेची मागणी पूर्ण करण्याच्या दिशेने घेऊन जाणार असून ऊर्जा क्षेत्रातील हा महत्त्वाचा टप्पा असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.

Back to top button