कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
कोल्हापूर लोकसभा मतदार संघात शाहू महाराज छत्रपती यांच्या पाठीशी शिवसेना उद्धव ठाकरे गट ताकदीनिशी उभा आहे, त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे ठाकरे गटाचे संपर्कप्रमुख अरूण दुधवडकर यांनी दै. पुढारीशी बोलताना सांगितले.
काँग्रेस व शिवसेना उद्धव ठाकरे गट राज्यातील काही लोकसभा जागांवर मैत्रीपूर्ण लढती लढणार असल्याचे स्पष्ट झाले. सांगलीतील जागेवरून काँग्रेस व शिवसेनमध्ये आगोदरपासूनच वाद होता. त्यातच उद्धव ठाकरे यांनी सांगली येथील जाहीर सभेत ही जागा शिवसेना लढणार असल्याचे जाहीर केले. यावरून वरिष्ठ पातळीवर मतभेदही झाले. यानंतर शिवसेनेने जाहीर केलेल्या लोकसभेच्या पहिल्या उमेदवार यादीत सांगलीतून चंद्रहार पाटील यांचे नाव निश्चित केले. त्यामुळे वादात आणखी ठिणगी पडली.
सांगली येथे जाण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी शाहू महाराज यांची नवीन राजवाडा येथे भेट घेतली. मी केवळ तूमच्या प्रचारात नाही तर विजयी सभेतही येणार, अशी ग्वाही ठाकरे यांनी दिली. त्या दिवसांपासून ठाकरे गटाचे कार्यकर्ते शाहू महाराज यांच्या प्रचारात सक्रीय झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते अनेक सभांमध्ये सहभागी होऊन शाहू महाराज यांचा प्रचार करत आहेत.
दुसरीकडे जागा वाटपाच्या चर्चेत सांगली प्रमाणेच भिवंडीसह मुंबईतील तीन जागांबाबत काँग्रेस व ठाकरे गटात वाद सुरुच होता. यावर तोडगा न निघाल्याने शिवसेना ठाकरे गट व काँग्रेस पक्ष काही मतदार संघात मैत्रीपूर्ण लढतील लढणार असल्याचे वृत्त आले. याअनुषंगाने कोल्हापूरातील ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज यांच्या प्रचारात सहभागी न होण्याचा निर्णय घेतल्याच्या बातम्या चॅनलवर प्रसिध्द झाल्या.
याबाबत ठाकरे गटाचे संपर्कप्रमुख अरूण दुधवडकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी शिवसेना शाहू महाराज यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे आणि कायम राहणार आहे. ज्या जागांवर वाद सुरु आहे तो वरिष्ठ नेते आपल्या पातळीवर सोडवतील. पण कोल्हापुरात शाहू महाराज यांचा शिवसैनिक प्रचार करणार नाहीत, अशा बातम्या चुकीच्या आहेत. उध्दव ठाकरे यांनी एकदा शाहू महाराज यांच्या पाठीशी राहण्याचा शब्द दिला आहे, हा शब्द निष्ठावंत शिवसैनिक शेवटपर्यंत पाळणार, असे त्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा :