नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा; शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठविण्यात आल्याच्या प्रकरणात ठाकरे गटाने दाखल केलेली याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावली होती. त्यावर ठाकरे गटाने मोठ्या खंडपीठासमोर दाद मागितली होती. ( Shiv Sena Row ) यासंदर्भातील सुनावणी पूर्ण झाली असून, खंडपीठाने निकाल राखून ठेवला आहे.
शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव तसेच धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह तात्पुरते गोठविले होते. आयोगाच्या आदेशाला ठाकरे गटाकडून दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. मात्र ठाकरे गटाला कोणताही दिलासा देण्यास उच्च न्यायालयाने 15 नोव्हेंबर रोजीच्या सुनावणीवेळी नकार दिला होता. त्यानंतर या गटाने मोठ्या खंडपीठासमोर याचिका दाखल केली होती. निवडणूक आयोगाने हा वाद वेळ न दवडता निकाली काढावा, असे निर्देशही त्यावेळी दिल्ली उच्च न्यायालयाने दिले होते.
नाव व चिन्ह गोठविण्यापूर्वी निवडणूक आयोगाने आपल्या अशिलाची बाजू अजिबात ऐकून घेतली नाही, असा युक्तिवाद ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी गुरुवारी झालेल्या सुनावणीवेळी केला. संबंधित पक्षकाराचे म्हणणे ऐकून न घेता नाव व चिन्ह गोठविण्याचे आयोगाच्या इतिहासातले हे पहिले उदाहरण असावे, असेही सिब्बल म्हणाले. दोन्ही बाजुंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर मुख्य न्यायमूर्ती सतीशचंद्र शर्मा आणि न्यायमूर्ती सुब्रम्हण्यम प्रसाद यांच्या खंडपीठाने निकाल राखून ठेवला.
हेही वाचा :