Latest

Shiv sena MLA disqualification hearing | आमदार अपात्रता प्रकरण : प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी शिंदे गटाला दोन आठवड्यांची मुदत

दीपक दि. भांदिगरे

मुंबई; पुढारी ऑनलाईन : शिवसेना आमदारांच्या अपात्रतेसंबंधी याचिकांवर आज गुरुवारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात झाली. दरम्यान, ठाकरेंच्या वतीने प्रतोद म्हणून सुनील प्रभू यांनी जो अर्ज दाखल केला आहे. त्यावर प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी शिंदे गटाला विधानसभा अध्यक्षांनी दोन आठवड्यांची मुदत दिली आहे. प्रभू यांनी जो अर्ज दाखल केला आहे त्यात मुख्यमंत्री शिंदे प्रतिवादी आहेत. व्हीपचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही याचिका आहे. त्याला उत्तर देण्यासाठी दोन आठवड्याची मुदत मागितली होती. ही मागणी विधानसभा अध्यक्षांनी मान्य केली असल्याची माहिती शिंदे गटाच्या वकिलांनी दिली आहे. दरम्यान, दोन्ही गटांना कागदपत्रांची देवाणघेवाण करण्यासाठी १ आठवड्याची मुदत देण्यात आली आहे. (Shiv sena MLA disqualification hearing)

संबंधित बातम्या

आमदार अपात्रता प्रकरणी शिंदे गटाकडून अनिल सिंग आणि ठाकरे गटाकडून असीम सरोदे बाजू मांडत आहेत. आमदार अपात्रता प्रकरणी तातडीने निर्णय द्यावा, अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात आली आहे. तर विधानसभा अध्यक्षांनी नीट बाजू समजून घेऊन निकाल द्यावा, असा युक्तिवाद शिंदेंच्या शिवसेनेकडून करण्यात आला आहे. तसेच सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी घेणे योग्य असल्याचे शिंदे गटाचे म्हणणे आहे. आमदारांना आपले म्हणणे लेखी स्वरुपात मांडण्याची मुभा दिली आहे. दरम्यान, याचिकेची कागदपत्रे मिळाली नसल्याचा दावा शिंदे गटाने केला आहे.

शिंदे गटाकडून वेळकाढूपणा – ठाकरे गट

आज सुनावणीला सुरुवात झाली आहे. दोन्ही बाजूंच्या वकिलांनी आज युक्तिवाद केला. आतापर्यंत २ याचिकांवर सुनावणी झाली आहे. तिसऱ्या याचिकेवर सुनावणी सुरु आहे, अशी माहिती शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांनी दिली.

सुनील प्रभू यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मागणी शिंदे गटाकडून करण्यात आली आहे. तर आमच्याकडील कागदपत्रे प्रभू यांना देऊ, असे शिंदे गटाच्या वकिलांनी सांगितले. तर सत्यासाठी आमची लढाई सुरु आहे आणि निर्णय आमच्याच बाजुने येणार असल्याचा दावा सुनील प्रभू यांनी केला आहे. निर्णय यापूर्वीच येणे अपेक्षित होते. शिंदे गटाकडून वेळकाढूपणा सुरु असल्याचा आरोप प्रभू यांनी केला आहे.

विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या आमदारांच्या याचिकांवर सुनावणी घेतली जात आहे. त्यासाठी आज दुपारी बारा वाजेपर्यंत आमदारांना उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

राज्यातील सत्तासंघर्षावरील निकालात सर्वोच्च न्यायालयाने आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपविला होता. त्यासाठी पुरेशा, योग्य कालावधीत निर्णय घेण्यासही बजावले होते. या निकालाच्या पाच महिन्यांनंतर विधानसभा अध्यक्षांकडे आता प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात झाली आहे. (Shiv sena MLA disqualification hearing)

दरम्यान, विधिमंडळातील सुनावणीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या कार्यालयात ठाकरे गटाच्या आमदारांची बैठक बोलावण्यात आली आहे.

हे ही वाचा :

SCROLL FOR NEXT