नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल लागल्यानंतर शिवसेना शिंदे गटात आनंद आहे तर ठाकरे गटात अस्वस्थता आहे. ठाकरे गटाला अनपेक्षित निकाल लागल्यानंतर ठाकरे गट या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे.
विधानसभा अध्यक्षांनी निकाल देताना २०१८ च्या घटनेचा उल्लेख केला होता. यावरुन निकाल फिरल्याचे बोलले जात आहे. मात्र ठाकरे गटाने या संदर्भातील कागदपत्रे निवडणूक आयोगाला दिली होती, त्याची नोंद आमच्याकडे आहे आणि आम्ही ती कोर्टात सादर करु, असे ठाकरे गटाने म्हटले आहे. तसेच या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेली चौकट अध्यक्षांनी निकाल देताना पायदळी तुडवल्याचा आरोप ठाकरे गटाने केला.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब दिल्ली दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडुन निकालाची प्रमाणित प्रत आल्यानंतर वकिलांशी चर्चा करून न्यायालयाकडे दाद मागणार असल्याचे सांगितले. दरम्यान, ठाकरे गटात कुठेही अंतर्गत धुसफूस नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सर्वोच्च न्यायालयानुसार सुनील प्रभू हे पक्षाचे व्हीप आहेत. भरत गोगावले आणि एकनाथ शिंदे यांची निवड अयोग्य आहे असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. असे असताना अध्यक्षांनी गोगावले यांनाही व्हीप म्हणून वैध ठरवले. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश विधानसभा अध्यक्षांनी पाळले नाहीत. त्यामुळे यावर सर्वोच्च न्यायालय निर्देश देईल असा विश्वास व्यक्त केला आणि याबद्द्ल न्यायालयाला विचारणा करणार आहोत. तसेच यामुळे सर्वोच्च न्यायालय मोठे की लवाद मोठे हा प्रश्न उपस्थित झाल्याचेही परब म्हणाले.
निवडणुक लढवण्याबाबत बोलताना ते म्हणाले की, आम्हाला कुठलेही चिन्ह दिले तरी आम्ही लढणार आहोत. तसेच २०१९ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठींबा देणाऱ्या पत्रावर उद्धव ठाकरे यांचीच सही आहे. यावर निवडणूक आयोगाने आम्हाला कधीही कारणे नोटीस दाखल केलेली नाही याचाही उल्लेख त्यांनी केला.
हेही वाचा