Latest

Shikshak Bharti 2024 : आचारसंहिता लागल्यास शिक्षक भरती लांबणार?

मोहन कारंडे

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : राज्यात एप्रिलमध्ये लोकसभा निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने पुढील महिन्यात आच- ारसंहिता लागू होऊ शकते. या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने उमेदवारांमध्ये संभ्रम होऊ नये म्हणून शिक्षक भरतीबाबत सूचना जारी केल्या आहेत. शिक्षक भरतीची प्रक्रिया लोकसभा निवडणुकीपूर्वी पूर्ण न झाल्यास ती पुढे निवडणुकीनंतर पूर्ण करण्यात येणार असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे.

राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमधील रिक्त असलेल्या २१ हजार ६७८ जागांसाठी शिक्षक भरती पवित्र पोर्टलच्या माध्यमातून राज्यात सुरु आहे. सध्या सुरू असलेल्या आणि प्राधान्यक्रम पूर्ण झालेली शिक्षक भरती सर्व स्तरावर पूर्ण होईपर्यंत आगामी काळात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीचे सावट उभे आहे. पात्र उमेदवारांनी पवित्र पोर्टलवर मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह अशा दोन प्रकारांतील कोणत्याही एका प्रकाराचे प्राधान्यक्रम लॉक केले असतील, तर उमेदवार पदभरतीसाठी त्या त्या लॉक केलेल्या प्राधान्यक्रमासाठी विचारात घेतला जाणार आहे. भविष्यात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पदभरती पूर्ण करण्याचा प्रयत्न शिक्षण विभागाचा आहे. मात्र तरीही काही अपरिहार्य कारणामुळे पदभरती निवडणुकीपूर्वी पूर्ण न झाल्यास ती पुढे पूर्ण केली जाईल. त्यामुळे पात्र उमेदवारांनी अनावश्यक चिंता करू नये, असे आवाहन शिक्षण विभागातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या न्यूज बुलेटीनद्वारे करण्यात आले आहे.

उमेदवार शिक्षक पदभरतीबाबत समाजमाध्यमातून वेगवेगळ्या प्रकारची चुकीची माहिती पसरवत आहेत, पात्र उमेदवारांनी अशा चुकीच्या माहितीकडे दुर्लक्ष करावे, असेही शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे.

शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा लवकरच सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यामध्ये ज्या उमेदवारांनी स्वप्रमाणपत्रामध्ये चुकीची माहिती नोंद केल्यामुळे किंवा स्वप्रमाणपत्र अपूर्ण ठेवल्यामुळे अथवा विहित मुदतीत स्वप्रमाणपत्र प्रमाणित न केल्यामुळे अशा विविध प्रकारच्या कारणांमुळे सध्याच्या पदभरती प्रक्रियेत सहभागी होता येत नाही, अशा उमेदवारांना नव्याने येणाऱ्या जाहिरातीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी स्वप्रमाणपत्र पूर्ण व दुरुस्त करण्याची संधी मिळणार आहे.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT